मुंबई : गुलाबनबी आझाद यांचा राजीनामा ही दुर्दैवी घटना आहे. यापूर्वी कपिल सिब्बल, अश्वनीकुमार, जितेंद्र प्रसाद आदींनी पक्ष सोडला. वर्षांनुवर्षे पक्षात काम केलेल्यांनी अशा पद्धतीने पक्षातून बाहेर पडावे लागते हे चुकीचेच आहे. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी माफक अपेक्षा गुलामनबी आझाद काय किंवा कपिल सिब्बल यांच्यासह आम्ही २३ नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यात चुकीचे काहीच नव्हते, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.  

 ते म्हणाले की, राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, अशी सर्वाची इच्छा होती व तशी मागणीही झाली होती. राहुल गांधी पद स्वीकारण्यास तयार नसल्यास अन्य कोणाची निवड व्हावी ही सर्वाचीच अपेक्षा आहे . यातून पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा काहीच प्रयत्न नव्हता. केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान देण्याकरिता काँग्रेस पक्ष मजबूत होणे आवश्यक आहे. मोदींचा पराभव करण्याकरिता विरोधी पक्षांची व्यापक आघाडी झाल्याशिवाय भाजपचा पराभव करणे आज तरी शक्य दिसत नाही. अशी व्यापक आघाडी करण्याकरिता काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी काँग्रेस नेतृत्वहिन असता कामा नये. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली अशी व्यापक आघाडी उभी राहिली होती. असाच प्रयत्न पुन्हा करावा लागेल.

ते पुढे म्हणाले की,  काँग्रेस पक्षात लोकशाही पद्धतीने चर्चेच्या माध्यमातून निर्णय व्हावेत एवढीच सर्वाची अपेक्षा असते. काँग्रेस पक्षाला जुने गतवैभव मिळावे ही सर्व काँग्रेसजनांची अपेक्षा आहे. लोकशाही पद्धतीने पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जाव्यात. कारण गेल्या २४ वर्षांत पक्षांतर्गत निवडणुकाच काँग्रेस पक्षात झालेल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.