देशातलं सध्याचं वातावरण चिंता निर्माण करणारं आहे, धर्म हा माणुसकीपेक्षा मोठा झाला आहे असं वातावरण या आधी देशात कधी पाहिलं होतं? असं म्हणत ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार यांनी खंत व्यक्त केली आहे. देशात याआधी कोणीही माणूस बिनधास्त आपलं म्हणणं मांडू शकत होता, आता मात्र तशी स्थिती राहिली नाही. देशासमोर आर्थिक संकट होतं मात्र धर्मिक संकट कधीही नव्हतं आता आपल्या देशात नाव विचारण्याआधी माणसाचा धर्म विचारला जातो ही परिस्थिती दुर्दैवी आहे असंही मत गुलजार यांनी व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या देशात तामिळ, गुजराती, मराठी, बंगाली यांसह अनेक भाषांना प्रांतिय भाषांचा दर्जा दिला जातो मात्र या भाषांना प्रांतिय म्हणणं चूक आहे, या भाषा देशातल्या प्रमुख भाषा आहेत, असंही गुलजार यांनी म्हटलं आहे. बंगळुरूमध्ये एका बुकस्टोरतर्फे कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं त्यात गुलजार यांनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात बोलताना गुलजार यांनी आपली परखड मतं मांडली आहे.

देशातल्या महाविद्यालयांमध्ये इंग्रजी साहित्य शिकवलं जातं मग भारतीय परंपरा का शिकवली जात नाही? कालिदास, युधीष्ठीर, द्रौपदी हे विषयही अभ्यासण्यासारखे आहेत. आपल्या संस्कृतीशी नातं सांगणारे जे विषय आहेत ते जर देशभरातल्या महाविद्यालयांमध्ये शिकवले गेले तर येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होईल. सआदत मंटो सारख्या आधुनिक लेखकाबाबतही महाविद्यालयांमध्ये शिकवलं पाहिजे. भारतात सध्याच्या घडीला राजकीय स्वातंत्र्य आहे मात्र सांस्कृतिक स्वातंत्र्य नाही. आपण मागासलेल्या मानसिकतेतून अजून बाहेरच आलेलो नाहीत.

चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँग यांचा मृत्यू झाला तेव्हा मला अतीव दु:ख झालं, मात्र त्यांच्या मृत्यूविषयी भारतात एकाही माणसानं काहीही लिहीलं नाही याचं जास्त वाईट वाटलं. आपण आपलं आयुष्य काही तुकड्यांमध्ये जगतो, कारण आपल्याला ते सोपं वाटतं, सुधारमतवादी लेखक डॉक्टर कलबुर्गी यांच्याबाबत मी लिखाण केलं आहे. धारवाडमध्ये त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली त्यावेळी मला वेदना झाल्या. विविध भाषांमध्ये त्यांनी लिखाण केलं होतं, लेखनाला वेगळी उंची गाठून देणाऱ्या माणसाचा शेवट आपल्या देशात असा होतो? हे वातावरण खूपच वाईट आहे असंही गुलजार यांनी म्हटलं आहे.

आजवर अनेक कवी, लेखक आणि साहित्यिकांनी देशातल्या असहिष्णू वातावरणावर भाष्य केलं आहे. आता त्या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ गीतकार गुलजार यांचाही समावेश झाला आहे. त्यांच्यावर टीका होईल ही बाब अलहिदा.. मात्र एका संवेदनशील माणसाला देशातल्या परिस्थितीबाबत वाटणारं भय हे देशाची चिंता वाढवणारं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulzar expressed concern about the countrys intolerance
First published on: 06-08-2017 at 17:53 IST