scorecardresearch

ज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”

“काहीही करुन देशात कायम हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चनांमधील बंधुभाव संपावा आणि आपल्याला संप्रदायिक अजेंडा चालवता यावा असा त्यांचा हेतू आहे,”

Gyanvapi mosque row Sharad Pawar
जाहीर सभेमध्ये शरद पवारांचं वक्तव्य (फोटो ट्विटरवरुन साभार)

वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केरळमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना महत्वाचं विधान केलं आहे. सध्या देशभरामध्ये ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आहे. वाराणसीमधील न्यायालयाकडून पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार असल्याचं मंगळवारी स्पष्ट झालं. याच दिवशी केरळमधील एका जाहीर सभेत बोलताना शरद पवारांनी या मशिदीसंदर्भात वक्तव्य केलं आहे.

“वाराणसीमधील मंदिर जेवढं जुनं आहे त्याचप्रमाणे ज्ञानवापी मशीद सुद्धा फार जुनी आहे,” असं शरद पवार म्हणाले आहेत. मागील ३००-४०० वर्षांमध्ये कोणीही मशिदीचा विषय काढला नाही, असंही पवार म्हणालेत. पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधताना, “अयोध्या प्रकरणानंतर आता वाराणसीमधील या प्रकरणावरुन वातावरण खराब करण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं जात आहे,” असा टोला लगावलाय.

“वाराणसीमध्ये मंदिर आहे. मंदिराला कोणाचा विरोध नाहीय. मात्र मंदिराजवळ एक मशीद आहे. आज या मशिदीच्या मुद्द्यावरुन देशामध्ये सांप्रदायिक वातावरण तयार करण्याचा कट रचला जातोय,” असंही पवार म्हणाले. “अयोध्येचा विषय संपल्यानंतर देशामध्ये शांतता प्रस्थापित होईल असं आम्हाला वाटत होतं. मात्र भाजपाचे विचार आणि विचारसरणी वेगळी आहे. अशाप्रकारची आणखी प्रकरणं समोर आणून देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय. अयोध्येनंतर आता वाराणसीमधून विषय समोर आणण्यामध्ये भाजपा आणि त्यांच्या पक्षाशी संबंधित संघटना जबाबदार असून हे खेदजनक आहे,” असंही पवार म्हणालेत. “या देशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा देशालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान वाटतो. ताजमहालसारखी वस्तू आपल्या देशाची ओळख आहे,” असंही पवार म्हणाले.

“आज राजस्थानमधील कोणीतरी समोर येऊन म्हणतं की ताजमहल आमचं आहे. आमच्या पूर्वजांनी ते बांधलंय. मात्र जगाला माहितीय दिल्लीचं कुतुबमिनार कोणी बांधलंय, तेथील न्यायालय यासंदर्भात निर्णय देणार आहे. मात्र काही लोक कुतुबमिनार हिंदुंनी बनवल्याचा दावा करत आहेत. मी या गोष्टी यासाठी मंडत आहे कारण देशासमोरील आजच्या खऱ्या समस्या महागाई, बेरोजगारीसारख्या आहेत. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हावं या हेतूने सांप्रदायिक विषयांना हवा दिली जात आहे,” असंही पवार म्हणालेत.

“मोदी सरकार आणि भाजपा आज देश चालवत आहे. त्यांचा अजेंडाच हा आहे की एक विषय संपल्यावर दुसरा विषय समोर आला. काहीही करुन देशात कायम हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चनांमधील बंधुभाव संपावा आणि आपल्याला संप्रदायिक अजेंडा चालवता यावा असा त्यांचा हेतू आहे,” अशी टीका पवारांनी केलीय.

“आज महिलांना घर संभाळणं कठीण झालं आहे. महागाई फार वाढलीय. मात्र हे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत. बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणतीही पावलं उचलली जात नाहीयत. यांना उत्तर देण्याचा एकच मार्ग आहे. सांप्रदायिक विचारांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पावलं उचलायला हवीत. आजच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी इतरांना मजबूत करणं आवश्यक आहे. केरळमध्ये ज्या पद्धतीने सर्व प्रोग्रेसिव्ह फ्रंटमध्ये लेफ्ट फ्रंट उभी आहे, त्यामध्ये राष्ट्रवादीचाही वाटा आहे,” असंही पवार म्हणालेत.

“या फ्रंटप्रमाणे बाकी राज्यांमध्येही काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच जिथे निवडणुका असतील तिथे राष्ट्रवादीचं एकच उद्देश असतं भाजपाला पराभूत करायचं आणि बाजूला काढायाचंय. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या तेव्हा एनसीपीने ममता बॅनर्जींना पाठिंबा दिला.बंगालमध्ये या विचारांविरोधात लढण्याची गरज होती. त्यामुळेच ममतांना समर्थन देण्याचा निर्णय आम्ही घेतला,” असं पवार म्हणाले.

“मी तुम्हालाही विश्वास देऊ इच्छितो की देशामध्ये सर्व सेक्युलर पक्षांनी एकत्र येऊन भाजपाला दूर करण्याचा कार्यक्रम स्वीकारला पाहिजे. या कामात सर्वात पुढे राष्ट्रवादी काँग्रेस असेल. या देशामध्ये बदल घडवून आणण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे. शेतकऱ्यांचं आयुष्य सुखकर झालं पाहिजे असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. तरुणांना रोजगार मिळावा अशी आमची भूमिका आहे, हेच काम आमच्या सर्व सहकाऱ्यांनी करण्याची गरज आहे,” असंही पवार म्हणाले.

“येथे जेवढे प्रोग्रेसिव्ह फ्रंट आहेत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. याचं उदाहरण आपण केरळमध्ये पाहू शकतो. येथील सरकार लोकांची काळजी घेणारं सरकार आहे. सरकारमध्ये सहभागी आमचे राष्ट्रवादीचे सहकारी चांगलं काम करत असल्याचा आनंद आहे,” असंही पवार यावेळी म्हणालेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gyanvapi row sharad pawar says mosque is as old as temple scsg