युपी विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपा प्रमुख मायावती यांना युतीची ऑफर दिली होती. मी मायावतींना मेसेज पाठवला होता, मात्र सीबीआय आणि ईडीच्या भीतीने त्यांनी काँग्रेससोबत युपी विधानसभा निवडणूक लढवली नाही, असे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी म्हणाले.

दिल्लीतील जवाहर भवन येथे ‘दलित ट्रुथ-बॅटल फॉर रिअलायझिंग आंबेडकर्स व्हिजन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “मायावतीजींनी यावेळी निवडणूक लढवली नाही. आम्ही मायावतींना युती करण्यासाठी मेसेज पाठवला, पण त्या बोलल्या देखील नाहीत.”

“ज्यांनी, कांशीरामजींनी, प्राणाचे बलिदान देत कष्टाने आणि मेहनतीने उत्तर प्रदेशात दलितांचा आवाज जागवला. त्यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले ही वेगळी बाब आहे. परंतु त्या आवाजासाठी मी लढणार नाही, असं आज मायावती म्हणतात. सीबीआयच्या भीतीपोटी मायावतींनी हे सगळं केलं,” असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले, “एक प्रकारे मी भिकारीच आहे, कारण माझ्या देशाने मला विनाकारण प्रेम दिले आहे. मी त्यांचा ऋणी आहे. मी रोज सकाळी उठतो आणि विचारतो की मला देशाकडून मिळालेलं हे प्रेम कसं परत करायचं?, देशाने मला केवळ प्रेमच दिले नाही, तर देशाने मला जोडेदेखील मारले. देशाने मला मोठ्या हिंसाचाराने मारले आहे. मला वाटलं असं का होतंय? त्याचं उत्तर मला मिळालं की माझ्या देशाला मला शिकवायचं आहे. देश मला सांगत आहे की शिक, समजून घे. दुःख असेल तर ते सहन करा पण शिका आणि समजून घ्या.”