Anurag Thakur : भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर यांच्या एका विधानाची मोठी चर्चा रंगली आहे. अनुराग ठाकूर हे शनिवारी हिमाचल प्रदेशमधील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. त्यावर विद्यार्थ्यांनी उत्तरेही दिले. मात्र, यावेळी अनुराग ठाकूर यांनी हनुमानजी पहिले अंतराळवीर होते असं म्हटलं. त्यांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त एका कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुराग ठाकूर शालेय विद्यार्थ्यांशी संवाद होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना विचारलं की, “अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती कोण होते?” या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की, “नील आर्मस्ट्राँग.” दरम्यान, विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरानंतर अनुराग ठाकूर यांनी म्हटलं की, “मला वाटतं की हनुमानजी अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती होते.” या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
दरम्यान, अनुराग ठाकूर यांच्या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदार कनिमोळी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटलं की, “संसद सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चंद्रावर प्रथम कोणी पाऊल ठेवलं असं विचारणं आणि नील आर्मस्ट्राँग नसून हनुमान होते असं सांगणे किंवा तसा आग्रह धरणे हे चुकीचं आहे”, असं खासदार कनिमोळी यांनी म्हटलं आहे.
पवनसुत हनुमान जी…पहले अंतरिक्ष यात्री। pic.twitter.com/WO5pG2hAqT
— Anurag Thakur (@ianuragthakur) August 23, 2025
अनुराग ठाकूर यांच्याकडून भारताच्या अंतराळ प्रगतीचं कौतुक
अनुराग ठाकूर यांनी आपल्या वेदांकडे, आपल्या पाठ्यपुस्तकांकडे आणि आपल्या ज्ञानाकडे वळण्याचंही आवाहन केलं. तसेच याच कार्यक्रमात अनुराग ठाकूर यांनी २०२३ मध्ये चंद्रयान-३ चे यश आणि शास्त्रज्ञांना पाठिंबा देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचा उल्लेख केला आणि अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचे कौतुक केलं.
अनुराग ठाकूर म्हणाले की, भारत २०३५ पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक उभारण्याचं आणि २०४० पर्यंत चंद्रावर क्रू लँडिंग करण्याचं ध्येय ठेवत आहे. पूर्वी आपल्याला आपले उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी परदेशी देशांची मदत घ्यावी लागत असे. मात्र, आता दुसरे देश आपली मदत घेतात”, असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.