गुजरात काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र आहे. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षात आपली अवस्था नुकतेच लग्न झालेल्या आणि नसबंदी करावी लागलेल्या वरासारखी झाल्याचं मोठं विधान केलंय. त्यामुळे हार्दिक पटेल यांची काँग्रेसवरील नाराजी जाहीर झालीय. पटेल यांनी काँग्रेस पक्षावर त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केलाय.

हार्दिक पटेल म्हणाले, “माझी पक्षातील अवस्था नुकतेच लग्न झालेल्या आणि नसबंदी करावी लागलेल्या वरासारखी झालीय. मला राज्याच्या पक्षाच्या कोणत्याही बैठकीला बोलावलं जात नाही. ते कोणताही निर्णय घेण्याआधी माझ्याशी साधी चर्चाही करत नाहीत. असं असेल तर या पदावर राहण्यात काय अर्थ आहे? नुकतीच पक्षाने नव्या ७५ सरचिटणीस आणि २५ उपाध्यक्षांची निवड केली. या यादीत नाही आणि असायला हवा असा कोणी सक्षम नेता आहे का असंही मला विचारण्यात आलं नाही.”

“माझ्यामुळे पक्षात काही लोकांना धोका वाटतो”

“काँग्रेसने पाटिदार समाजाच्या आंदोलनामुळे २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. त्यावेळी काँग्रेसला २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत १८२ सदस्य असलेल्या विधीमंडळात ७७ जागा मिळाल्या. मात्र, त्यानंतर काय झालं? पक्षातील अनेकांना वाटतं की काँग्रेसकडून माझा योग्य उपयोग होत नाही. माझ्यामुळे पक्षात काही लोकांना धोका वाटतो त्यामुळे असं होत असेल,” असंही मत हार्दिक पटले यांनी व्यक्त केलं.

“काँग्रेस पक्षात आहे त्या लोकांचा वापर का करत नाही?”

“मी टीव्हीवर पाहतोय की काँग्रेस नरेश पटेल यांना २०२२ च्या निवडणुकीसाठी पक्षात घेऊ इच्छित आहे. मला आशा आहे की ते २०२७ च्या निवडणुकीसाठी आणखी एका नव्या पटेलला शोधणार नाहीत. काँग्रेस आधीच पक्षात असलेल्या लोकांचा वापर का करत नाही?” असा सवालही हार्दिक पटेल यांनी विचारला.

हेही वाचा : …म्हणून जिग्नेश मेवाणींनी टाळला काँग्रेस प्रवेश; पत्रकार परिषदेत सांगितलं कारण!

इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचा वेळ मिळत नसल्याकडेही बोट केलं. पंजाब काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष काही नेत्यांसह सोनिया गांधी यांची भेट घेतात, मग गुजरातच्या कार्यकारी अध्यक्षांना हाच आदर का मिळत नाही? असा प्रश्न हार्दिक पटेल यांनी उपस्थित केला.