हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलवर भारताकडून लावण्यात येणाऱ्या आयात शुल्कावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भलतेच नाराज झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी एका महिन्यात दुसऱ्यांदा भारताच्या आयत धोरणांवर टिका केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारताला सुनावले आहे. भारताने आयात शुल्क 50 टक्क्यांनी कमी करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र त्यानंतर यामधून अमेरिकेला काहीच मिळणार नाही. आम्हाला निष्पक्ष आणि योग्य सौदा हवा असल्याचे ट्रम्प म्हणाले. आयात शुल्क कमी करुन आपण अमेरिकेवर उपकार करत आहोत असे भारताला वाटत असले तरी त्यामधून अमेरिकेला काहीच फायदा होत असल्याचीही टिका ट्रम्प यांनी केली आहे.

ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेबद्दल यावेळी बोलताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक दिवस मला फोन करुन आयात शुल्क 75 टक्के केल्याची माहिती दिली आणि आता ते आणखीन कमी करुन 50 टक्के करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावर मी केवळ ठीक आहे एवढेच उत्तर दिले. आता 50 टक्के आयात शुल्क कमी केल्याने मी उत्साहीत होने अपेक्षित नव्हते आणि तसेच मी वागलो असे ट्रम्प म्हणाले. त्याचप्रमाणे आजच्या घडीला आकारण्यात येणारे आयात शुल्क योग्य नसल्याबद्दलची नाजारीही ट्रम्प यांनी व्यक्त केले. सर्व राज्यांच्या राज्यपालांबरोबर झालेल्या एका बैठकीमध्ये ट्रम्प बोलत होते.

भारतीय कंपन्या अमेरिकेबरोबर मोठ्या प्रमाणात व्यापार करतात. त्यांच्याकडे तयार झालेली वहानेही आमच्या देशात येतात. मात्र त्यामधून अमेरिकेला काहीच मिळत नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तर दुसरीकडे आमच्या देशात तयार होणाऱ्या मोटारसायकलवर भारतात 100 टक्के कर लावण्यात येतो. हे योग्य नसल्याचे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.

नक्की वाचा: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर हल्ला बोल

याआधीही मागील आठवड्यात पोलाद उद्योगाबाबत अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांशी चर्चा करताना ट्रम्प यांनी भरताच्या आयात कर धोरणावर टिका केली होती. अमेरिका आयात होणाऱ्या मोटारसायकलींवर शून्य आयात शुल्क लावते, त्यामुळे अमेरिकेच्या मोटारसायकलींवर भारताने आयात शुल्क आकारणे हे अन्यायकारक असल्याचे म्हटले होते. अशा प्रकारे चढे आयात शुल्क लावले जाणार असेल तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊन तुमच्या वस्तूंवरचे आयात शुल्क वाढवू अशा इशाराही त्यांनी दिला होता.