Harsh Vardhan Shringla on Donald Trump Tariff : आयात शुल्काच्या (टॅरिफ) मुद्यावरून भरत आणि अमेरिकेत तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेने भारताच्या निर्यातीवर ५० टक्के कस्टम ड्युटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यापैकी २५ टक्के शुल्क ७ ऑगस्टपासून लागू करण्यात आलं आहे. तर उर्वरित ५० टक्के शुल्क आज (२७ ऑगस्ट) मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या टॅरिफची घोषणा केल्यापासून उभय देशांमधील अंतर वाढलं आहे. असं असलं तरी भारताला आशा आहे की या स्थितीत सुधारणा होईल.

भारताचे माजी परराष्ट्र सचिव व राज्यसभा खासदार हर्षवर्धन श्रृंगला यांनी ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. श्रृंगला हे व्हर्जिनियामधील एका कार्यक्रमात म्हणाले, “ही स्थिती तात्पुरती आहे. दोन्ही देश लवकरच व्यापार कराराच्या (फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट) मार्गावर आणखी पुढे जातील. अमेरिकेने भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के आयात शुल्क लावलं असून ही चिंतेची बाब असली तरी यामुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडणार नाहीत.”

ट्रम्प यांचं टॅरिफ अस्त्र निष्प्रभ करण्यासाठी मोदी सरकारची योजना तयार

श्रृंगला हे व्हर्जिनियाच्या रेस्टन येथील कार्यक्रमात म्हणाले, आज मध्यरात्रीपासून अमेरिकेचं टॅरिफ लागू होणार आहे. मात्र, आम्ही त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काम करत आहोत. भारत त्याचे पर्याय तयार करत आहे. भारत ऑस्ट्रेलिया, यूएई व ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी युरोपीय संघ आणि ऑस्ट्रेलियाबरोबर चर्चा करत आहे. भारत आता या देशांमधील निर्यात वाढवण्यावर काम करत आहे.

अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफचा भारतावर काय परिणाम होईल?

अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफचा भारतातील अनेक क्षेत्रांवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच हजारो नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. अमेरिकन बाजारपेठेत कापड, रत्ने आणि दागिने, कोळंबी, कार्पेट आणि फर्निचर यांसारख्या कमी मार्जिन असलेल्या भारतीय वस्तूंची निर्यात जास्त आहे. या निर्यातदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर, व्हिएतनाम, बांगलादेश, कंबोडिया अगदी चीन आणि पाकिस्तान (ज्यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सध्या कमी कर लादले आहेत) सारख्या स्पर्धकांना फायदा होऊ शकतो.