Haryana DGP on Thar : अनेकांचे थार ही एसयूव्ही कार विकत घेण्याचे स्वप्न असते, पण जर तुमच्याकडे थार असेल तर तुम्ही कदाचित वेडे असू शकता असे मत हरियाणाचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांनी व्यक्त केले आहे. हरियाणाचे डीजीपी ओ. पी. सिंह यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना वाहनांची तपासणी करत असताना कोणती पद्धत अवलंबली जावी याबद्दल समजावून सांगितले, यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनी अशी तपासणी करताना विनम्र राहिले पाहिजे असेही नमूद केले. पुढे ते पोलिस कशा प्रकारे सर्वच वाहने तपासणीसाठी थांबवत नाहीत, पण थार कार असेल तर मात्र सोडून देणे त्यांना शक्य होत नाही, याबद्दल हसत-हसत बोलू लागले.
डीजीपी नेमकं काय म्हणाले?
डीजीपी ओ. पी. सिंह म्हणाले की, “जर ती एक थार असेल, तर आम्ही ती कशी सोडून देऊ शकतो? किंवा जर ती बुलेट दुचाकी असेल…. सर्व बदमाश घटक याच दोन्हींचा वापर करतात. वाहनाची निवड तुमची मानसिकता दाखवते. जे लोक थार चालवतात ते रस्त्यांवर स्टंट करतात. एका सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मुलाने थार चालवताना एका व्यक्तीला चिरडले. त्यांना आपल्या मुलाला सोडवून घ्यायचे आहे, म्हणून आम्ही त्याला विचारले की, ही गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर्ज आहे. तर ती त्यांच्या नावावर आहे, त्यामुळे तेच बदमाश आहेत,” असे सिंह हे हिंदीत बोलताना म्हणाले.
एका त्यांच्या सहकारी पोलीसाकडे वळून ते पुढे म्हणाले, “जर आपण पोलिसांची यादी केली, तर किती जणांकडे थार असेल? आणि ज्यांच्याकडे असेल ते नक्कीच वेडे असले पाहिजेत (दिमाग घुमा हुआ होगा उसका)… ते एक स्टेटमेंट आहे. थार ही एक कार नाही, ते एक स्टेटमेट आहे. जे सांगते की ‘मी हा असा आहे’. ठीक आहे मग, भोगा. तुम्हाला दोन्हीचा आनंद कसा मिळेत. तुम्ही गुंडगिरी कराल आणि पकडले न जाण्याची अपेक्षा कराल, दोन्ही कसे शक्य होईल,” असेही ते म्हणाले. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
हरियाणाच्या डीजीपींचे विधान हे थट्टेत केल्याचे दिसत होते. थार कारचा वापर स्टंट करण्यासाठी केल्याच्या घटना वाढल्याने त्यांनी हे विधान केले असावे. गेल्या काही दिवसात गाडीच्या वर बसलेली महिला, स्टंट करताना थारमधून विद्यार्थी पडणे, चालत्या थारमधून लघुशंका करणे अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डीजीपींचे हे विधान आले आहे.
तसेच अनेक घटनांमध्ये थार गाडी बेजवाबदारपणे चालवल्याने अपघात झाल्याच्या अनेक घटना देखील समोर आल्या आहेत.
