Haryana Man killed in California who Entered in US via Donkey Route : अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे कपिल (२६) या भारतीय तरुणाची शनिवारी (६ सप्टेंबर) गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेने कॅलिफोर्नियासह अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. एका इसमाला सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यापासून रोखल्यामुळे कपिलची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. कपिल हा मूळचा हरियाणातील जींद जिल्ह्यातील बराह गावचा रहिवासी होता.

कपिल हा कॅलिफोर्नियामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो जींद जिल्ह्यातील बराह या गावातील ईश्वर यांचा मुलगा होता. त्याच्या हत्येबद्दल माहिती देताना बराह गावचे सरपंच सुरेशकुमार गौतम यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सागितलं की “कपिलने ड्युटीवर असताना एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यापासून रोखलं होतं. त्याच रागातून त्या व्यक्तीने कपिलवर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर कपिलचा जागीत मृत्यू झाला.”

कपिलचे वडील ईश्वर व त्यांचं कुटुंब शेती करून उदरनिर्वाह करत आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे कपिलने पैसे कमावण्यासाठी अमेरिकेची वाट धरली होती. सव्वादोन वर्षांपूर्वी तो अमेरिकेला गेला होता.

डॉन्की रूटने अमेरिकेत घुसखोरी

टीओआयच्या रिपोर्टनुसार कपिलने २०२२ मध्ये तथाकथित ‘डॉन्की रूट’ने (डंकी मार्ग) पनामा जंगल पार करून, मेक्सिकोच्या सीमेवरील भिंत ओलांडून अमेरिकेत प्रवेश केला होता. यासाठी त्याच्या कुटुंबाने तब्बल ४५ लाख रुपये खर्च केले होते. अमेरिकेत गेल्यावर कपिलला सुरुवातीला अटक झाली होती. परंतु, कायदेशीर कारवाईनंतर त्याची सुटका झाली आणि त्यानंतर तो तिथेच स्थायिक झाला.

मृतदेह परत आणण्यासाठी कपिलच्या कुटुंबाची धडपड

कपिलच्या अमेरिकेत राहणाऱ्या एका नातेवाईकाने त्याच्या मृत्यूची माहिती दिली. त्याच्या मागे आई-वडील आणि दोन बहिणी असं कुटुंब आहे. यापैकी एका बहिणीचं लग्न झालं आहे. सरपंच गौतम म्हणाले, “या बिकट परिस्थितीत आमचं संपूर्ण गाव ईश्वर यांच्या कुटुंबाच्या पाठिशी आहे. सध्या ते खूप दुःखी आहेत. ईश्वर यांचं कुटुंब उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन कपिलचा मृतदेह भारतात परत आणण्याची मागणी करणार आहे. सरकार आम्हाला सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे.”