India Pakistan Tensions : हरियाणा येथील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला हेरगिरी केल्याच्या तसेच पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या संशयावरून अटक करण्यात आले आहे. देवेंद्र सिंग ढिल्लन असे या २५ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून तो पटियाला येथील खालसा कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. त्याला त्याच्या फेसबुकवर पिस्तूल आणि बंदुकांचे फोटो अपलोड केल्याप्रकरणी १२ मे रोजी कैथल येथून अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान असे समोर आले की तो गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये करतारपूर कॉरिडॉरमार्गे पाकिस्तानला गेला होता आणि तो पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस एजन्सीच्या (आयएसआय) अधिकाऱ्यांबरोबर संवेदनशील माहिती शेअर करत होता.

पोलिसांनी काय सांगितले?

पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकार्‍यांनी ढिल्लन याच्यावर खूप पैसे खर्च केल्याचे सांगितले जात आहे. कैथलच्या पोलिस अधीक्षक आस्था मोदी यांनी सांगितलं की, पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या ढिल्लन याने पाकिस्तानी अधिकार्‍यांबरोबर पटियाला लष्करी छावणीचे फोटोही शेअर केले आहेत. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

दरम्यान ढिल्लन याचा फोन जप्त करण्यात आला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आळा आहे. याबोरबरच त्याचे आणि पाकिस्तानी अधिकार्‍यांमध्ये झालेले व्यवहार तपासण्यासाठी त्याच्या बँक खात्याची देखील माहिती घेतली जात आहे.

२४ वर्षीय नौमान इलाही याला पानिपत येथून अशाच आरोपांखाली अटक करण्यात आल्यानंतर ढिल्लन याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या नौमन हा हरियाना येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो होता. त्याला पाकिस्तानला माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्याच्या मेव्हण्याच्या खात्यात एजंटकडून पैसे पाठवले जात होते.

७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर लष्करी हल्ले केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने शस्त्रविरामावर एकमत झालं. त्यानंतर १० मे पासून सीमेवर शांतता पाहायला मिळत आहे. यादरम्यान देशाविरोधात हेरगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहा जणांना अटक

दरम्यान पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरविल्याबद्दल आज (१७ मे) सहा भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हरियाणाच्या एका यूट्यूबर तरुणीचाही समावेश आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांची साखळी हरियाणा आणि पंजाबमध्ये सक्रिय असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे. हिसारमधील सिव्हिल लाईन्स पोलिसांनी सहा जणांना अटक केली. यूट्यूबर तरूणीचे नाव ज्योती मल्होत्रा असून तिचे यूट्यूबवर ‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाचे चॅनेल आहे.