Maharshi Dayanand University Case: हरियाणाच्या रोहतकमधील महर्षी दयानंद विद्यापीठात दोन महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मासिक माळीदरम्यान कामात कसूर केल्यानंतर त्यांना मोठ्या अवमानकारक परिस्थितीला तोंड द्यावे लागले. मासिक पाळी येत असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांना गुप्तांगांचे आणि सॅनिटरी पॅडचे फोटो काढण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. ज्यामुळे हरियाणा पोलिसांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठाच्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर विद्यापीठाने दोन स्वच्छता पर्यवेक्षकांना निलंबित केले आहे. तसेच घटनेची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पीजीआयएमएस पोलीस ठाण्यात स्वच्छता पर्यवेक्षक वितेंदर आणि विनोद हुडा तसेच सहाय्यक निबंधक श्याम सुंदर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमुख रोशन लाल यांनी सांगितले.
प्रकरण काय आहे?
हरियाणाच्या महर्षी दयानंद विद्यापीठातील हे प्रकरण असून २६ ऑक्टोबर रोजी हरियाणाचे राज्यपाल असीम कुमार घोष हे विद्यापीठाला भेट देणार होते. त्यांच्या दौऱ्याच्या काही तास आधी सदर प्रकार घडला. त्यादिवशी कामावर येण्यासाठी चार स्वच्छता कर्मचारी महिलांना उशीर झाला. यामुळे पर्यवेक्षक वितेंदर कुमार आणि विनोद हुडा यांनी उशीरा येण्याचे कारण विचारले.
सॅनिटरी पॅडचा फोटो देण्यास सांगितले
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, उशीरा आलेल्या महिलांनी नेमके कारण सांगण्यास टाळाटाळ केली. मात्र पर्यवेक्षकांनी दबाव टाकल्यानंतर त्यांनी मासिक पाळी आल्याचे सांगितले. यावरही पर्यवेक्षकांचे समाधान झाले नाही, सदर महिला खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. मासिक पाळी आली असल्यास त्याचा पुरावा काय? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
दरम्यान एका महिलेने दावा केला आहे की, पर्यवेक्षकांनी मासिक पाळीचा पुरावा मागण्यासाठी त्यांना गुप्तांगाचे आणि सॅनिटरी पॅडचे फोटो काढण्यास सांगितले. जेव्हा आम्ही हे करण्यास नकार दिला, तेव्हा आम्हाला शिवीगाळ करण्यात आली आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली.
महिलांनी दावा केला की, पर्यवेक्षकांनी दबाव टाकल्यानंतर आणि सहाय्यक निबंधक श्याम सुंदर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर चार पैकी दोन महिलांनी या सूचनांचे पालन केले आणि शौचालयात फोटो काढले.
दरम्यान या घटनेमुळे विद्यापीठात संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली आहेत. या निदर्शनाला विद्यार्थ्यांचाही पाठिंबा मिळाला आहे. हरियाणा राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष कृष्ण कुमार यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची भेट घेतली असून त्यांनी निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले.
