त्या दोघांचंही एकमेकांवर जिवापाड प्रेम…ती दलित समाजातील…तर तो पंजाबी समाजातील. दोघांच्या घरातून त्यांच्या प्रेमाला विरोध…अखेर त्यांनी आपला मार्ग निवडला. दोघांनीही पळून जाऊन लग्न केलं. संसारात चढ-उतार सुरु होते. पण दुसरीकडं त्यांच्यातील प्रेम आणखीनच बहरत होतं. जानेवारीत त्यांनी लग्न केलं. त्याला आता सहा महिन्यांचा कालावधी उलटला होता. पण मागील शनिवारी त्यांच्या आयुष्यात वादळ आलं. तिचा भाऊ आणि मामा त्यांच्या घरी आले. आपला भाऊ आणि मामा लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आले म्हणून आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. तिनं त्यांच्यासाठी चहा केला. पण त्याचवेळी घात झाला. दोघांनीही तिच्या पतीची चाकूने भोसकून हत्या केली. ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील ही कथा वाटेल. पण ही घटना प्रत्यक्षात घडलीय हरियाणातील हिसारमध्ये.
हरियाणातील हिसारमध्ये श्याम अरोरा या २५ वर्षांच्या तरुणाची शनिवारी हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासानंतर हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचं सांगण्यात आलं. श्याम अरोरानं सपना या दलित तरुणीशी यावर्षी जानेवारीत लग्न केलं. त्यांच्या लग्नाला दोघांच्याही घरातून विरोध होता. त्यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. त्याचा राग मुलीच्या घरातील लोकांच्या मनात होता. शनिवारी सपनाचा भाऊ साहील आणि तिचा मामा पवन हे दोघे त्यांच्या घरी आले. सपनाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. तिनं भाऊ आणि मामाचं घरी स्वागत केलं. त्यांच्यासाठी चहा केला. काही वेळातच तिच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं. तिच्या भावाने आणि मामाने श्यामची चाकूने भोसकून हत्या केली. त्याच्यावर सहा वार केले. सपनानं त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात तिलाही जखमा झाल्या आहेत. साहील आणि पवन यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी पवन कुमार यांनी दिली. साहिलचा भाऊ आणि त्याच्या आईविरोधातही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्यामच्या हत्येच्या कटात सपनाचं कुटुंब सामील असल्याचा संशय़ आहे. त्या दिशेनं पोलिसांचा तपास सुरु आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, श्यामची हत्या करण्यासाठी संशयित आरोपींनी उत्तर प्रदेशातून पिस्तूल खरेदी केलं होतं. पण घटनेच्या दिवशी पिस्तूलचा वापर करता आला नाही. त्यांनी श्यामची चाकूने भोसकून हत्या केली आणि पसार झाले. सपनानं जखमी अवस्थेत श्यामला शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात नेलं पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली.