Hathras professor sexual exploitation: उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सेठ फूल चंद बागला (पीजी) महाविद्यालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयातील पर्यवेक्षक पदावर काम करणाऱ्या रजनीश कुमार नामक नराधमाने अनेक विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. रजनीश कुमार भूगोल विभागाचा प्रमुख असल्याचे सांगितले जात आहे. एका निनावी पत्रामुळे या नराधमाचे कृत्य उघड झाले. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कारासह विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत.

आरोपी रजनीश कुमारने केलेल्या लैंगिक छळाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. सदर घटना उजेडात आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने पर्यवेक्षक रजनीश कुमारला निलंबित केले आहे. जिल्हा प्रशासनानेही या विकृत प्रकाराची नोंद घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चार सदस्यांची समिती स्थापन करून सात दिवसांत तपास करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

आरोपी रजनीश कुमार सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एका पीडित विद्यार्थीनीने एका वृत्तवाहिनीला निनावी पत्र लिहिल्यानंतर हे प्रकरण उघड झाले.

असा करायचा शोषण

महाविद्यालयातील विद्यार्थीनींना चांगले गुण मिळवून देणे आणि सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून रजनीश कुमार त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर नराधम विद्यार्थीनींना बोलावून त्यांचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडीओ चित्रीकरण करत असे. यानंतर हेच व्हिडीओ दाखवून तो त्यांच्यावर पुन्हा पुन्हा अत्याचार करत असे. व्हिडीओ चित्रीत केल्यामुळे विद्यार्थीनीही त्याच्याविरोधात तक्रार करण्यास धजावत नसत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निनावी पत्रात काय म्हटले?

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार त्यांना एका पीडितेने निनावी पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये नराधन रजनीश कुमारच्या अत्याचाराचा पाढा वाचण्यात आला. या पत्रासह एक पेनड्राईव्हही पाठविण्यात आला आहे. ज्यामध्ये ५९ अश्लील व्हिडीओ असल्याचा दावा एनडीटीव्हीने केला आहे.