नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षांवर शिंदे गटाचा युक्तिवाद गुरुवारी नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील सुनावणी आता होळीच्या सुट्टीनंतर, १४ मार्च रोजी होणार आहे. सुनावणी रेंगाळल्यामुळे निकालही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शिंदे गटाला गुरुवारी पहिल्या सत्रात युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले होते. दुपारच्या सत्रामध्ये ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिबल प्रतिवाद करणार होते. सरन्यायाधीशांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद आवरता घेतला. नंतर विधिज्ञ हरीश साळवे यांनी आक्रमक युक्तिवाद केला. पण, भोजनाच्या मध्यंतरापर्यंत साळवे यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. वेळापत्रकाप्रमाणे शिंदे व ठाकरे गटाच्या वकिलांचे युक्तिवाद संपण्याची शक्यता दुरावली. त्यामुळे सरन्यायाधीशांनी दुपारच्या सत्रातील घटनापीठाचे कामकाज रद्द केले.
आता होळीच्या सुट्टीनंतर दोन आठवडय़ांनी मंगळवारी घटनापीठासमोर साळवे आपला युक्तिवाद पुढे नेतील. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी, मिनदर सिंग हेही बाजू मांडणार आहेत. राज्यपालांच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता युक्तिवाद करतील. त्यानंतर सिबल आणि सिंघवी प्रत्युत्तर देतील. वकील असीम सरोदे यांनी, मतदारांच्या वतीने बाजू ऐकून घेण्याची विनंती केली. त्यावर, सिबल यांच्याशी चर्चा करावी व लेखी मुद्दे मांडावेत, अशी सूचना सरन्यायाधीशांनी केली.