कोट्टयम/ इडुक्की : दक्षिण आणि मध्य केरळला शनिवारी जोरदार पावसाने तडाखा दिला असून पूर आणि दरडींच्या  घटनांत पाच जणांचा मृत्यू ओढवला आहे. कोट्टयम, इडुक्की जिल्ह्य़ांच्या सीमेवरील पर्वतीय भागांतील दरडी कोसळण्याच्या  घटनांमध्ये  अनेक लोक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  बचावकार्यासाठी लष्कर, हवाई दलाची मदत मागणे राज्य सरकारला भाग पडले आहे.

कोट्टयम व इडुक्की जिल्ह्य़ांच्या सीमेवरील ज्या पर्वतीय भागांत दरडी कोसळून वेगळ्या झालेल्या काही कुटुंबांच्या सुटकेसाठी हवाई दलाची मदत मागवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले.

कोट्टयम व इडुक्की जिल्ह्य़ांतील अनुक्रमे कूट्टिक्कल व पेरुवंतनम या दोन पर्यवतीय भागांत भूस्खलनाच्या घटना झाल्याचे वृत्त असून, या घटनांमध्ये किमान १० जण बेपत्ता असल्याची भीती आहे, असे अधकाऱ्यांनी सांगितले.

मदतीसाठी हवाई दल आणि  लष्कर यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिली.