नवी दिल्ली : पक्षामध्ये तळागाळातील नेतृत्वाला विकसित होण्यास मदत करा आणि आपापसात भांडू नका असा सल्ला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक शाखांसाठी नेतृत्व विकास मोहीमह्ण यावर राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना खरगे यांनी पक्षाच्या भवितव्याचा विचार करण्याचे आवाहन केले.
यावेळी स्वत:चे उदाहरण देताना खरगे यांनी दावा केला की, ज्यांना लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवासाठी भाजपला मदत केली होती, त्यांनाही कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी देण्यात आले कारण पक्षाला यश मिळावे अशी इच्छा होती. ते म्हणाले की, ‘आपल्याला नेतृत्व विकासाचा प्रसार करायचा आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्थानिक नेत्यांशी भांडायला सुरुवात करावी आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार करावी. तुम्हाला स्थानिक नेत्यांबरोबर समन्वयाने काम करायचे आहे’ असे त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले.
पक्षाच्या उदयपूर चिंतन शिबिरामध्ये नेतृत्व विकास मोहिमेची घोषणा करण्यात आली होती असे खरगे यांनी सांगितले. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे ते यावेळी म्हणाले. लोकशाही आणि राज्यघटनेला वाचवणे हे काँग्रेसचे मुख्य उद्देश आहे असे ते म्हणाले.