व्हिएतनाम युद्धापासून ते अमेरिका-चीन संबंधांमधील कळीच्या चर्चांपर्यंत आपल्या चाणक्यनीतीचा दीर्घकालीन प्रभाव पाडणारे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री व नोबेल पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर यांचं १००व्या वर्षी निधन झालं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळात हेन्री किसिंजर यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणात निभावलेली भूमिका अमेरिकेचं जागतिक पटलावरील स्थान मजबूत करण्यात महत्त्वाची ठरली. कनेक्टिकटमधील राहत्या घरी किसिंजर यांनी अखेरचा श्वास घेतला. हेन्री किसिंजर यांच्या ‘किसिंजर असोसिएट्स इंक’ या संस्थेकडून त्यांच्या निधनाचं वृत्त देण्यात आलं आहे. मात्र, निधनाच्या कारणाविषयी निश्चित माहिती देण्यात आलेली नाही.

दोन प्रमुख जबाबदाऱ्या पार पाडणारे एकमेव अमेरिकी नागरिक

हेन्री किसिंजर यांनी ६० च्या दशकाच्या उत्तरार्धात रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळात अमेरिकन सरकारचे गृहमंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अशा दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. या काळात उत्तर व्हिएतनामशी झालेला पॅरिस शांतता करार, इस्रायल व इतर अरब राष्ट्रांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, त्या काळी आंतरराष्ट्रीय शांततेसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या अमेरिका-रशिया शस्त्र निर्बंध चर्चा, चीनशी धोरणात्मक संबंधांची सुरुवात अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हेन्री किसिंजर यांनी समर्थपणे पार पाडल्या.

हेन्री किसिंजर…व्यक्त अव्यक्ताची कलासाधना

व्हिएतनाम व कंबोडियातील धोरण

अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेचे परराष्ट्रमंत्री म्हणून हेन्री किसिंजर यांनी राबवलेल्या काही धोरणांवरून अमेरिकेला टीकेचाही सामना करावा लागला. विशेषत: १९६८ मध्ये व्हिएतनाम युद्धासंदर्भातील भूमिका किंवा कंबोडियातील अमेरिकेचं धोरण यावरून बरीच टीका तेव्हा निक्सन सरकारला सहन करावी लागली होती. मानवी हक्क उल्लंघनाच्या आरोपांचा सामना अमेरिकेला करावा लागला होता.

यासंदर्भात वॉशिंग्टन पोस्टमध्ये छापून आलेल्या मजकुराचा दाखला इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तात देण्यात आला आहे. “जागतिक पातळीवर तटस्थ असणाऱ्या कंबोडियातील गुप्त बॉम्बहल्ले व त्यापाठोपाठ कंबोडियात झालेली घुसखोरी यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉ. हेन्री किसिंजर यांना जबाबदार धरतात. यामुळेच दक्षिण-मध्य आशियातील तणाव वाढला आणि त्यातून कंबोडियात खमार रफ यांनी आपला पाया बळकट केला”, असं या मजकुरात नमूद करणम्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोबेल पुरस्काराचा वाद

हेन्री किसिंजर यांना व्हिएतनाम युद्धादरम्यान निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं. १९७३ साली झालेल्या व्हिएतनाम युद्धबंदीसाठी त्यांनी उत्तर व्हिएतनामशी यशस्वीरीत्या चर्चा घडवून आणल्याबद्दल त्यांना व उत्तर व्हिएतनामचे ली ड्यूक थो यांना संयुक्तपणे हा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. एकीकडे किसिंजर यांनी मोठ्या सन्मानाने या पुरस्काराचा स्वीकार केला असताना दुसरीकडे ली ड्यूक थो यांनी मात्र हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. किसिंजर यांच्या निवडीमुळे झालेल्या वादातूनच तत्कालीन नोबेल पुरस्कार निवड समितीतील दोन सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचा त्याग केला होता.