मोदींच्या स्वच्छ भारत योजनेचे हिलरींकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम हाती घेतल्याबद्दल अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम हाती घेतल्याबद्दल अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी त्यांचे कौतुक केले आहे. महिलांनी जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हावे असेही त्यांनी म्हटले आहे.
आपण आपले पती बिल क्लिंटन यांच्यासमवेत भारताचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो त्यांनी स्वच्छ भारत मोहीम तर राबवली आहेच शिवाय महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यावर भर दिला आहे. मुली मोठय़ा झाल्यानंतर शाळेत जात नाहीत, महिलाही घरापासून फार दूर कामासाठी जात नाहीत कारण तेथे स्वच्छतागृहे नसतात. एका अभ्यासानुसार इंडोनेशियातील बाजारपेठात जे लोक काम करतात त्यात ९० टक्के महिला आहेत. जेवढय़ा प्रमाणात तिथे महिला काम करतात तेवढय़ा प्रमाणात स्वच्छतागृहे मात्र नाहीत, त्याचा जरा विचार करा, याशिवाय तेथे मुलांची काळजी घेण्याची व्यवस्था नाही. ही स्थिती बदलायला हवी, असे क्लिंटन म्हणाल्या.
जर जास्तीत जास्त महिला कामात सहभागी झाल्या त्यांना पुरुषांइतकेच वेतन मिळाले तर अमेरिका व जगातील इतर अर्थव्यवस्था वेगाने पुढे जातील. महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढली तर एकूण देशांतर्गत उत्पन्न वाढेल. विकसित देशात येत्या १५ ते २० वर्षांत त्यात ८, ९, १० टक्के वाढ होईल व कमी विकसित देशात ३० ते ४० टक्के वाढ होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hillary clinton praises pm modis swachh bharat campaign

ताज्या बातम्या