हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत येण्यास सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उना येथील एका जाहीर सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने मैदान सोडून पळ काढल्याने यावेळी निवडणुकीत मजा येत नाहीये, असा टोला त्यांनी लगावला. माध्यमांतही भाजपबाबत लिहिले जात आहे. काँग्रेसचे नेते आले असते तर, धुमल यांच्यावर नसेल बोलायचं तर निदान मोदींवर तर टीका करायची. पण यावेळी असं काहीच दिसत नाहीये. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होणार आहे, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

जनतेला काँग्रेसच्या हेतूबाबत आता समजले आहे. काम करणारे सरकार कसे असते आणि कमजोर सरकार कसे असते, हे सामान्य मतदारांनाही समजू लागले आहे. जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते, तेव्हा ते नेहमी एक रूपयाचं उदाहारण देत. दिल्लीतून एक रूपया निघतो आणि ग्रामीण भागात जाईपर्यंत त्याचे १५ पैसे होतात, असे ते म्हणत. रूपयाची झीज करणारा तो पंजा कोणता होता, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्यापासून सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता होती. पण त्यांना अजून याबाबत काही करता आले नाही. राजीव गांधींनी आजार सांगितला पण इलाज नाही, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, मी आता ठरवलंय की दिल्लीतून एक रूपया निघेल तेव्हा गरिबांच्या खिशात १०० पैसे निश्चितच जातील. आता कुठला पंजा गरिबांचा हक्क हिसकावून घेणार नाही. आम्ही रोज स्वच्छता करून भ्रष्टाचार दूर करत आहोत.

देशात विकासावरच चर्चा व्हायला हवी, असे म्हणत त्यांनी जीएसटीबाबतही भाष्य केले. जीएसटीला कोणत्याही व्यापारी संघटनेचा विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी छोट्या व्यापाऱ्यांना खूप त्रास होत असत. नाक्यानाक्यांवर ट्रक अनेक दिवस उभे राहत. जीएसटीमुळे मालवाहतुकीच्या खर्चात कपात झाली आहे. त्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळाल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. येणाऱ्या काळात जीएसटी समितीच्या बैठकीत उर्वरित समस्याही सोडवल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.