आसाममधील गुवाहाटी येथे काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस समोरा-समोर आले होते. याप्रकरणी मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांनी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जमावाला भडकवल्याचा आरोप हिंमता बिस्व सरमा यांनी राहुल गांधींवर केला आहे.
नेमकं काय घडलं?
राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आसाममध्ये आहे. ही यात्रा गुवाहाटी शहरातून जाणार होती. पण, वाहतूक कोंडीच्या कारणास्तव यात्रेला शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. तरीदेखील कार्यकर्ते जमा झाले आणि पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स तोडण्यात आले. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते समोरा-समोर आले.
यानंतर संबोधित करताना राहुल गांधींनी बॅरिगेट्स तोडलेल्या कार्यकर्त्यांना ‘बब्बर शेर’ असं म्हटलं. “आम्ही बॅरिगेट्स तोडले आहेत. पण, कायदा हातात घेणार नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.
या घटनेनंतर हिंमता बिस्व सरमा यांनी ‘एक्स’ अकाउंटवर ट्वीट करत राहुल गांधी आणि कार्यकर्त्यांवर ‘असभ्य वर्तन’ आणि ‘नक्षलवादी डावपेच’ वापरल्याचा आरोप केला.
“नक्षलवादी डावपेचात आणि आमच्या संस्कृतीत खूप फरक”
हिंमता बिस्व सरमा म्हणाले, “हे आसामी संस्कृतीचा भाग नाही. आमचे राज्य शांतताप्रिय आहे. अशा नक्षलवादी डावपेचात आणि आमच्या संस्कृतीत खूप फरक आहे. राहुल गांधींनी जमावाला चिथावणी दिल्याबद्दल डीजीपींना व्हिडीओ पाहून गुन्हा नोंद करण्याचे निर्देश दिलेत. तुमच्या असभ्य वर्तनामुळे गुवाहाटीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.”
“आसामचे मुख्यमंत्री धमक्यावण्याचं काम करत आहेत”
याला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आसामचे मुख्यमंत्र्यांनी यात्रेला केलेल्या विरोधाचा आम्हालाच फायदा होत आहे. यात्रेला प्रसिद्धी देण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आम्हाला मदत करत आहे. आसामचे मुख्यमंत्री धमकवण्याचं काम करत आहेत. पण, आमचा न्याय यात्रेचा संदेश जनतेपर्यंत पोहचत आहे. यात्रा का थांबवली जातेय? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.”