गोमांस दिल्याच्या तक्रारीवरून कारवाई 

दिल्लीतील केरळ हाऊसमध्ये गोमांस दिले जात असल्याच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी छापा टाकल्याने नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. छापा टाकण्याचा हा प्रकार दुर्दैवी असल्याचे केरळचे मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांनी म्हटले आहे. चंडी यांच्या आरोपाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला आहे.
या प्रकाराची संधी साधून केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. पोलिसांची कृती म्हणजे संघराज्यीय रचनेवर करण्यात आलेला हल्ला असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले असून, सदर आरोप भाजपने फेटाळला आहे.
दिल्लीतील केरळ सरकारच्या अतिथीगृहातील रेस्टॉरण्टमध्ये गोमांस दिले जाते, अशी तक्रार आल्याने पोलिसांनी केवळ चौकशी केली आणि ती कायद्याला अनुसरूनच होती, असे स्पष्टीकरण भाजपने दिले आहे. ओम्मन चंडी या प्रश्नाला राजकीय रंग देत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दिल्लीतील रेस्टॉरण्टमध्ये गोमांस देणे बेकायदेशीर आहे, असे भाजपने म्हटले आहे. केरळ हाऊसच्या संकुलात गोमांस आमटी दिली जाते या आरोपाचा स्पष्ट इन्कार करण्यात आला, केवळ म्हशीचे मांस दिले जात होते, तेही सध्या बंद करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
उपाहारगृहात गोमांस दिले जाते, अशी तक्रार आल्यानंतर केरळ हाऊसच्या संकुलात परवानगीविना प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.
केरळ हाऊस हे खासगी हॉटेल अथवा नफा मिळविणारी संस्था नाही, तर हे राज्य सरकारचे अधिकृत अतिथीगृह आहे, त्यामुळे पोलिसांची कारवाई दुर्दैवी आहे, असे चंडी म्हणाले. या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी चंडी यांना पाठिंबा दिला आहे.

पोलीस आयुक्तांचा नकार
केरळ हाऊसवर पोलिसांनी छापा टाकल्याच्या आरोपाचा दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी स्पष्ट इन्कार केला आहे. पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून ही कृती केली, असे समर्थनही त्यांनी केले. पोलिसांनी छापा टाकल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता.

‘गायीचे नव्हे; म्हशीचे मांस’
केरळ हाऊसच्या उपाहारगृहात गोमांस दिले जाते, या आरोपाचा केरळचे मुख्य सचिव जिजी थॉमसन यांनी सपशेल इन्कार केला आहे. आम्ही कधीही गोमांस दिलेले नाही, म्हशीचे मांस देण्यात आले होते आणि त्यामुळेच काही जणांना गोमांस दिल्याचा संशय आला, गोमांस कधीही देण्यात आलेले नाही, असेही थॉमसन म्हणाले. निवासी आयुक्तांकडून परवानगी न घेताच काही जणांनी केरळ हाऊसमध्ये प्रवेश केल्याने दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलीस कोणती कारवाई करतात त्याची प्रतीक्षा करीत आहोत, असेही मुख्य सचिव म्हणाले.