पीटीआय, नवी दिल्ली
भारत आणि ब्रिटनने मंगळवारी दुहेरी योगदान करारासह ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करारा’वर (एफटीए) स्वाक्षरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यातील दूरध्वनी संभाषणानंतर जाहीर करण्यात आलेला हा व्यापार करार युरोपियन महासंघामधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने केलेला सर्वांत मोठा व्यापार करार ठरला आहे.
‘ऐतिहासिक टप्प्यात, भारत आणि ब्रिटनने दुहेरी योगदान करारासह एक महत्त्वाकांक्षी आणि परस्पर फायदेशीर असा मुक्त व्यापार करार यशस्वीरीत्या पूर्ण केला. हे महत्त्वाचे करार दोन्ही देशांदरम्यानची व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करतील आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, विकास, रोजगार निर्मिती आणि नव उपक्रमांना चालना मिळेल, ’ असे पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यम संदेशात म्हटले आहे.
‘जगभरातील देशांशी संबंध मजबूत करणे आणि व्यापारातील अडथळे कमी करणे हे एक मजबूत आणि अधिक सुरक्षित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठीच्या बदलाच्या योजनेचा एक भाग आहे,’ असे ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर म्हणाले.
विकासाची द्वारे खुली..
वस्तू आणि सेवांच्या व्यापाराचा समावेश असलेल्या या संतुलित, न्याय्य आणि महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करारामुळे द्विपक्षीय व्यापारात लक्षणीय वाढ होईल. रोजगारासाठी नवीन मार्ग निर्माण होतील, राहणीमान उंचावेल आणि दोन्ही देशांमधील नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे. दोन्ही देशांना जागतिक बाजारपेठांसाठी उत्पादने आणि सेवा विकसित करण्याची द्वारे खुली होतील.