Holi 2025 : देशभरात विविध ठिकाणी होळीचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. आज (१४ मार्च) धूलिवंदन देखील उत्साहात साजरे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बुरा न मानो होली है!’, असं म्हणत होळीचं सेलिब्रेशन केलं जातं. मात्र, होळीच्या आधी रंग लावण्यास नकार दिल्याने तीन जणांनी एका २५ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी या दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी सायंकाळी रालावस गावात घडली. रालवास गावातील रहिवासी अशोक, बबलू आणि कालूराम हे मृत हंसराज नावाच्या व्यक्तीला रंग लावण्यासाठी त्याच्याकडे एका स्थानिक ग्रंथालयात गेले होते. हंसराज हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पण तेथे गेल्यानंतर हंसराजने रंग लावण्यास नकार दिला. याचा राग आल्याने अशोक, बबलू आणि कालूराम यांनी हंसराजला लाथाबुक्यांनी आणि बेल्टने मारहाण केली. त्यानंतर या तिघांपैकी एका आरोपीने हंसराजचा गळा दाबून हत्या केली, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश अग्रवाल यांनी यांनी दिली. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, मृताच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी हंसराजचा मृतदेह घेऊन निषेध करत आंदोलन केलं. गुरुवारी पहाटे १ वाजेपर्यंत परिसरातील राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. हंसराजच्या कुटुंबाला ५० लाख रुपये भरपाई तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि आरोपी तिघांना तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजस्थानमध्ये सुरक्षेत वाढ

होळी आणि शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात शांतता समितीच्या बैठका झाल्या आहेत. राजस्थानचे पोलीस महासंचालक उत्कल रंजन साहू यांनी सांगितलं की,”राज्यातील पोलीस कर्मचारी नेहमीच आपले कर्तव्य कर्तव्यनिष्ठेने पार पाडतात जेणेकरून आपण आणि आपण सर्वजण हा सण पारंपारिक उत्साहाने साजरा करू शकू.”