एपी, प्रोव्हो

Robert Redford Passes Away:  हॉलिवूडचे ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळखले जाणारे ऑस्कर विजेते अभिनेते, दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबरच मुख्य स्टुडिओ प्रणालीबाहेर कमी पैशांमध्ये स्वतंत्र चित्रपट, लघुपटाची निर्मिती करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी रेडफोर्ड ओळखले जात.

अमेरिकेच्या युटाच्या पर्वतराजींमधील राहत्या घरी रॉबर्ट रेडफोर्ड यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती प्रसिद्धी अधिकारी सिंडी बर्गर यांनी दिली. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. ‘‘मृत्युसमयी रॉबर्ट रेडफोर्ड यांच्याजवळ त्यांचे प्रियजन उपस्थित होते,’’ असे बर्गर यांनी सांगितले.

लखलखती कारकीर्द

गत शतकाच्या १९६०च्या दशकात रेडफोर्ड यांना स्टारपद मिळाले आणि १९७०च्या दशकात ते हॉलिवूडचे सर्वात प्रमुख स्टार झाले होते. ‘द कँडिडेट’, ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ आणि ‘द वे वी वेअर’ हे त्यांचे चित्रपट लोकप्रिय झाले. १९८०च्या ‘ऑर्डिनरी पीपल’ या चित्रपटासाठी रेडफोर्ड यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला, ‘ऑर्डिनरी पीपल’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीही ऑस्कर पुरस्कार पटकावला होता. ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ या चित्रपटात रेडफोर्ड यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे पत्रकार बॉब वूडवर्ड यांची भूमिका साकारली होती. त्यांनी ‘जेरेमिया जॉन्सन’ या चित्रपटात रंगवलेल्या शीर्षकपात्रानेही प्रशंसा मिळवली होती. कारकिर्दीच्या अखेरच्या काळात रेडफोर्ड यांनी २०१३मध्ये ‘ऑल इज लॉस्ट’ या एकपात्री चित्रपटात भूमिका केली, त्यानंतर २०१८च्या ‘द ओल्ड मॅन अँड द गन’ या आपल्या अखेरच्या चित्रपटाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.

कार्यकर्ता कलाकार

रॉबर्ट रेडफोर्ड यांना देखणे रुप मिळाले होते, मात्र सामान्य व्यक्तींच्या भूमिका करण्यासाठी ते आपल्या रुपात बदल करण्यासाठी विशेष मेहनत घेत. उदारमतवादी राजकीय विचारसरणी, साधारण व्यक्तिरेखा रेखाटण्याची इच्छा आणि कमी बजेट असलेल्या चित्रपटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी समर्पण यामुळे हॉलिवूडमधील अन्य लोकप्रिय अभिनेत्यांच्या तुलनेत रॉबर्ट रेडफोर्ड यांचे वेगळेपण ठळकपणे दिसून येत असे.