शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का? असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आज विचारण्यात आला त्यावर अमित शाह यांनी दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. ते म्हणाले “मी काही ज्योतिषी नाही, शिवसेना असो की अकाली दल आम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. एनडीएमधून हे दोन्ही पक्ष स्वतःच बाहेर पडले आहेत. त्याला आम्ही काय करु शकतो” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील वर्षी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपा यांची युती संपुष्टात आली. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपाला शिवसेनेने साथ सोडल्यामुळे विरोधात बसावं लागलं. त्याआधी जेव्हा महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेची सत्ता होती तेव्हाही सातत्याने भाजपावर टीका करण्याचं काम शिवसेनेने केलं होतं. भाजपाची साथ सोडल्यानंतर तर शिवसेनेने आणखी प्रखर टीका करण्यास सुरुवात केली. सध्याच्या घडीला मंदिरं उघडण्याचा मुद्दा असो किंवा इतर मुद्दे भाजपाने शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर शिवसेनाही भाजपाविरोधात खुलेपणाने बोलते आहे. सामनातले अग्रलेख, सुशांत सिंह प्रकरण, कंगनाची वक्तव्यं या सगळ्या विषयांमध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्या आरोपांच्या फैरी झडलेल्या पाहण्यास मिळाला. दुसरीकडे कृषि विधेयकांचा मुद्दा पुढे करुन अकाली दलानेही भाजपाची साथ सोडली आहे.

या दोन्ही पक्षांबाबत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना प्रश्न विचारला असता या दोन्ही पक्षांनी एनडीएची साथ सोडली आहे आम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. त्यावर मी काय करु शकतो? असं उत्तर दिलं आहे. नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister amit shah gave this answer about alliance with shivsena scj
First published on: 18-10-2020 at 16:42 IST