प्रौढ व सज्ञान व्यक्तींमधील परस्परसंमतीने असलेले समलैंगिक संबंध वैध ठरवणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा २००९मधील निर्णय रद्दबातल ठरवत ‘समलिंगी संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हाच असून त्यासाठी जन्मठेपेची तरतूद कायम आहे,’ असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.
लैंगिकता हा विषय आपल्याकडे नेहमीच दांभिकतेने हाताळला गेला आहे. समलिंगी संबंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामागची संभावनादेखील अशीच करावयास हवी. या निर्णयावर देशभरात सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून नाराजीचे सूर उमटले. त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीसुद्धा समलिंगी संबंध गुन्हा ठरविण्याचा निर्णय निराशाजनकच असल्याचे म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाआधी दिल्ली उच्च न्यायालयाने २ जुलै २००९ रोजी ऐतिहासिक निकालात कलम ३७७ अन्वये बेकायदा ठरवण्यात आलेले समलिंगी संबंध वैध ठरवले होते, तसेच दोन प्रौढ व्यक्तींमधील खासगी लैंगिक संबंध जर संमतीने असतील तर तो गुन्हा नाही, असे म्हटले होते.
परंतु, यामुळे सनातन्यांचे माथी भडकली. समलिंगी संबंधामुळे धार्मिक भावनांना ठेच पोहोचेल, अशी कारणे दाखवून सनातनींनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयास आव्हान दिले. वास्तविक ज्या समाजात लग्न या पावित्र्याने वगैरे बांधलेल्या व्यवहाराचे वर्णन अधिकृतपणे ‘शरीरसंबंध’ असे रोखठोक केले जाते, त्या समाजाने लैंगिकतेस इतके पडदानशीन करणे हास्यास्पद आहे.
लैंगिकतेबाबतचा मागास कायदा बदला, अशी नि:संदिग्ध भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेणे ही काळाची गरज होती. हे कर्तव्य सर्वोच्च न्यायालयाने पार न पाडल्यामुळे नकळतपणे सनातन्यांना बळ मिळते. याबाबतच्या कायद्यात बदलाची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर सोडणे, हे अपेक्षाभंगास निमंत्रण देणारे ठरेल. इतकी प्रागतिक अपेक्षा त्यांच्याकडून ठेवणे धाष्टर्य़ाचेच. समलिंगी भिन्नलिंगी हा भेदाभेद अमंगळ आहे.
समलैंगिकतेबाबतच्या सर्वोच्च न्यालयाच्या निकालावर बॉलीवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांनी संदिग्ध भूमिका घेत, यावर देशात मोठ्या प्रमाणावर वाद आणि चर्चा होते आहे. काही ठाम दृष्टिकोन व्यक्त केले जात आहेत. काही जणांकडून राग आणि अविश्वास दर्शविला जातो आहे, तर काही जण टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत करताहेत. या सर्व प्रकाराची कोणत्या दिशेने वाटचाल होणार, याची चिंता अमिताभ यांनी व्यक्त केली आहे.
समलिंगी संबंध म्हणजे काय?
समलैंगिकतेकडे कल असणं ही विकृती नाही. हे नैसर्गिक आहे. आणि हा कुठलाही आजार नाही. ही एक शरीराची व मनाची अवस्था आहे. जसं पुरुषाला स्त्रीचं आकर्षण वाटणं, स्त्रीला पुरुषाचं आकर्षण वाटणं, त्यांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटणं हे नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे स्त्रीला – स्त्रीचं, पुरुषाला – पुरुषाचं आकर्षण वाटू शकतं. समान लिंगाच्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवण्याकडे कल असू शकतो. मात्र, भारतीय समाजाने अशा संबंधांना मान्यता दिलेली नसल्यामुळे त्याकडे विकृती म्हणून बघितलं जातं. समलिंग असणार्या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना समलिंगी संबंध असे म्हणतात. समान लिंगी व्यक्तींचे म्हणजे स्त्री-स्त्री अथवा पुरुष-पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध.
समलिंगी संबंध गुन्हाच ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचार फेरविचार करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकार फेरविचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. तूर्ततरी या विषयावरून देशातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे, हे नक्की.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2013 रोजी प्रकाशित
समलैंगिक संबंध: आता पुढे काय?
लैंगिकता हा विषय आपल्याकडे नेहमीच दांभिकतेने हाताळला गेला आहे. समलिंगी संबंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामागची संभावनादेखील अशीच करावयास हवी.

First published on: 13-12-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homosexuality relation what next