Honeymoon Murder Case Explained इंदूर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी सोनम रघुवंशी यांचा विवाह ११ मे रोजी झाला. त्यानंतर २० मे रोजी हे दाम्पत्य मधुचंद्रासाठी सुरुवातीला बंगळुरुला आणि त्यानंतर गुवाहाटी येथे असलेल्या कामाख्या मंदिरात गेलं. गुवाहाटीहून हे दोघंही २३ मे रोजी शिलाँगमधील इस्ट खासी हिल्स या ठिकाणी गेले होते. मात्र त्या ठिकाणाहून दोघंही बेपत्ता झाले. या दोघांनीही भाडे तत्त्वावर फिरण्यासाठी मिळणारी अॅक्टिव्हा घेतली होती अशीही माहिती मिळाली आहे. या ठिकाणी असलेल्या पर्वतरांगा पाहण्यासाठी हे दोघं गेले होते. मात्र नंतर राजाची हत्या सोनमनेच सुपारी किलिंग करणाऱ्या तिघांकडून केली. यामध्ये सोनमचा बॉयफ्रेंड राजा कुशवाहाचाही हात होता. एक महिन्यात काय घडलं? जाणून घेऊ.
२४ मे पासून शोधमोहीम
सुरुवातीला सोनम आणि राजा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी, शिलाँग पोलिसांनी, मध्य प्रदेश पोलिसांनी, गिर्यारोहण पथकांनी, एसडीआरएफने सगळ्यांनी या दोघांचा शोध सुरु केला होता. मात्र हे दोघं सापडत नव्हते. मध्य प्रदेश सरकारने मेघालय सरकारला या दोघांना शोधण्याची विनंतीही केली. सुरुवातीच्या टप्प्यात ही घटना अपहरण किंवा काहीतरी घातपाताची असावी असंच सगळ्यांना वाटत होतं. पण २ जून उजाडला आणि सगळ्या गोष्टी बदलल्या.
२ जूनला सापडला राजाचा मृतदेह
२ जूनच्या दिवशी राजा रघुवंशीचा मृतदेह इस्ट खासी हिल्स भागातल्या दरीत आढळून आला. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह १५० फूट खोल दरीत सापडला. ज्या ठिकाणी या दोघांनी वापरलेली अॅक्टिव्हा सापडली होती तिथून साधारण २५ किमी अंतरावर राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. राजाची पत्नी सोनम २ जूनपर्यंत बेपत्ता होती तिचा शोध पोलीस घेऊ लागले. ११ दिवसांनी राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला. राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांच्या ड्रोनला दिसला. हा मृतदेह १५० फूट खोल दरीत होता. तसंच राजाचा मृतदेह इतका सडला होता की त्याची ओळख पटवणं कठीण होतं. अखेर या मृतदेहाच्या हातावर राजा हे नाव गोंदलेलं होतं त्यावरुन त्याच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली.
राजाच्या मृतदेहाजवळ पोलिसांना काय काय सापडलं?
राजा रघुवंशीचा मृतदेह पूर्णपणे सडला होता. त्याच्या हातावरील राजा या टॅटूवरुन त्याच्या मृतदेहाची ओळख पटली. Pentra 40 या गोळ्यांचं पाकीट, एका महिलेचा पांढरा शर्ट, मोबाइलच्या एलईडी स्क्रीनचा एक भाग सापडला. तसंच राजा रघुवंशीच्या मृतदेहाच्या डाव्या मनगटावर एक स्मार्ट वॉच सापडलं. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा या प्रकरणात सोनमचे कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा विशिष्ट क्रमांकांवर सोनम सातत्याने फोनवर बोलत होती हे पोलिसांना समजलं. त्यानंतर या प्रकरणात राज कुशवाहाला पोलिसांनी अटक केली. राज कुशवाहाच्या अटकेनंतर ८ जूनच्या रात्री सोनम पोलिसांना शरण आली. ती उत्तर प्रदेशातील गाझिपूर या ठिकाणी होती. एका ढाबा चालवणाऱ्या माणसाला तिने फोन मागितला. त्यानंतर तिने घरी फोन केला. सोनमला अटक झाल्यानंतर राजाच्या हत्येची सगळी घटना उघड झाली.

सोनमने शरण आल्यानंतर पोलीस चौकशीत काय माहिती दिली?
१) सोनम आणि राज या दोघांचं अफेअर होतं. राजा रघुवंशीच्या हत्येचा कट सोनमने १८ मे रोजी म्हणजेच लग्न झाल्यानंतर सात दिवसांतच आखला होता. सोनम आणि राजा यांनी हा कट आखला होता, अशी माहिती राजेश दंडोतिया यांनी दिली.
२) राज कुशवाह हा सोनमच्या भावाच्या कंपनीत वितरणाचं काम पाहतो. त्याने तिघांना राजाची हत्या करण्याची सुपारी दिली. पोलिसांनी राज कुशवाह आणि चौहानला इंदूरहून अटक केली. तर आनंद कुमार आणि सागर यांनाही मध्य प्रदेशातील दुसऱ्या एका ठिकाणाहून अटक केली.
३) सोनमचे कॉल रेकॉर्ड पोलिसांनी तपासले तेव्हा तिचा सहभाग हत्येत आहे हे पोलिसांना समजलं.
४) ज्यांना सुपारी देण्यात आली होती त्यांना सोनमने लाईव्ह लोकेशन पाठवण्याचं काम सोनमने केलं होतं असाही दावा पोलिसांनी केला.
५) मेघालयातील विशेष तपास समितीने म्हणजेच एसआयटीने हे सांगितलं की राजाच्या मृतदेहावर खुणा होत्या, तसंच धारदार शस्त्राने हल्ले केल्याच्या खुणा आहेत असंही सांगितलं.
६) राजाच्या आईने सांगितलं की हनिमूनला जाण्यापूर्वी सोनमने तिकिटं बुक करण्यासाठी राजाकडून ९ लाख रुपये घेतले होते. हॉटेलचं बुकिंग आणि तिकिटांचं बुकिंग सोनमने केलं होतं. तसंच हनिमूनला जाताना आपण दागिनेही घेऊन जाऊ असाही आग्रह सोनमने केला होता. ही माहिती पोलिसांनी दिली.
२३ मे रोजी राजाची हत्या कशी झाली?
२३ मे रोजी राजा आणि सोनम हे दोघंही शिपारा होम स्टे या ठिकाणी आले. पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी या दोघांनी चेक इन केलं. त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास राजा आणि सोनम हे दोघंही ट्रेकला जाण्यासाठी तयार झाले. याचवेळी सोनमने ज्या तिघांना राजाच्या हत्येची सुपारी दिली होती ते तिघेही जवळच्या एका होम स्टेमध्ये राहिले होते. साधारण १० वाजण्याच्या सुमारास सोनम आणि राजाने ट्रेक करत असताना २ हजार पायऱ्यांचं अंतर पार केलं. त्याआधी त्यांची भेट आनंद, आकाश आणि विशाल यांच्याशी झाली होती. साधारण १० वाजण्याच्या सुमारास राजा, सोनम, आकाश, विशाल आणि आनंद या पाचही जणांना अल्बर्ट या टुरिस्ट गाईडने पाहिलं होतं. अल्बर्टने दिलेल्या जबाबामुळेच सोनमच यामागे असावी हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपासाची चक्रं फिरवली. या टुरिस्ट गाईने दिलेल्या माहितीनुसार सोनम या चार जणांच्या मागून चालत होती तर तिच्या चालण्याचा वेग थोडा मंदावला होता.
२३ मेच्या दुपारी १२.३० च्या दरम्यान सोनमचा सासूला फोन
दुपारी १२.३० च्या दरम्यान सोनमने राजाची आई उमा रघुवंशी यांना फोन केला. मी खूपच दमले आहे आणि उपास ठेवला आहे असं तिने सासूला म्हणजेच राजाच्या आईला सांगिलं. त्यावेळी उमा रघुवंशी राजाशीही बोलल्या. राजाशी हा आपला शेवटचा संवाद आहे हे तेव्हा त्यांना मुळीच वाटलं नव्हतं. साधारण आणखी अर्ध्या तासाने दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हे पाचही जण मावलखियाट या ठिकाणाहून वेई सावदोंग धबधब्याच्या दिशेने निघाला. त्यावेळी सोनलने या तिघांना इशारा केला ज्यानंतर राजाच्या डोक्यावर चाकू हल्ला करण्यात आला. राजाची हत्या करण्यात आली तेव्हा सोनम तिथेच उपस्थित होती. राजाच्या हत्येनंतर सोनमने राजाच्या मोबाइलवरुन सात जन्मो का साथ असं लिहून एक सोशल मीडिया पोस्ट केली. दुपारी २.३० च्या दरम्यान राजाचा मृतदेह दरीत फेकण्यात आला. असा घटनाक्रम राजाच्या मृत्यू आधी घडला.

राजाला कामाख्या मंदिरात सोनम का घेऊन गेली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनमने राजाला हे पटवून दिलं की आपलं लग्न झालं आहे. आपल्याला लग्न पूर्णत्वास न्यायचं असेल आणि आपल्याला मनाने आणि शरीराने एकत्र यायचं असेल तर कामाख्या मंदिरात जाणं आवश्यक आहे. कामाख्या देवीचं दर्शन घेतलं की आपलं लग्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. राजालाही सोनमचं हे म्हणणं पटलं होतं त्यामुळे तो तिच्यासह बंगळुरुहून गुवाहाटीला गेला आणि तेथील कामाख्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला ही माहिती दिली.
अल्बर्ट पीडीने दिलेल्या माहितीमुळे सोनम आली पोलिसांच्या रडारवर
अल्बर्ट पीडी हा शिलाँगचा टुरिस्ट गाईड आहे. त्याने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. पोलिसांना त्याने सांगितलं की सोनम आणि राजा यांच्यासह तिघांना त्याने पाहिलं होतं. नोंग्रियाट ते मावलखियाट या ठिकाणी हे तिघंही राजा आणि सोनम यांच्यासह तीन हजार पायऱ्या चढून गेले होते. गाईडने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि इतर तिघे हे समोर चालले होते तर सोनम ही या चौघांच्या मागे होती. सगळे हिंदीत बोलत होते. अल्बर्टने पोलिसांना हेदेखील सांगितलं की त्याला हिंदी समजत नाही. पण काहीतरी गडबड आहे असा संशय त्याला आला होता. यानंतर पोलीस आणखी सावध झाले आणि त्यांनी या हत्येमागे सोनम तर नाही ना? हा पैलू तपासण्यास सुरुवात केली. ज्यानंतर सोनम रघुवंशीच या घटनेच्या मागे असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. मेघालय पोलिसांनी यासंदर्भातल्या मोहिमेला ऑपरेशन हनिमून असं नाव दिलं आहे.
ऑपरेशन हनिमून
ऑपरेशन हनिमूनच्या अंतर्गत १२० पोलीस कर्मचारी कार्यरत होते. पोलिसांना या गोष्टीचाही संशय आला की हनिमूनला आलेल्या सोनमने सोनम आणि राजाचा एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. नवविवाहीत जोडपं आणि सोशल मीडियावर पत्नीने एकही फोटो पोस्ट केला नाही ही बाब पोलिसांना नॉर्मल वाटली नाही. कारण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश हनिमून कपल्स ही हनिमूनला आल्यानंतर ज्या प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देतात तिथले फोटो आवर्जून सोशल मीडियावर पोस्ट करतात. सोनमने शिलाँगला आल्यानंतर तिचा आणि राजाचा एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही ही बाब पोलिसांना खटकली होती. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु असताना एक सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या हाती लागलं. ज्यामध्ये आकाश, विशाल आणि आनंद या आरोपींसह सोनम दिसते आहे. ही जागा राजाचा मृतदेह जिथे सापडला तिथून १० किमी अंतरावर सोनम आरोपींसह दिसली होती. पोलिसांनी सांगितलं की सोनमने तिचा रेनकोट जाणीवपूर्वक आकाशला दिला होता. त्यावर रक्ताचे डाग होते. हा रेनकोट हत्या झालेल्या ठिकाणापासून ६ किमी अंतरावर झुडुपांमध्ये फेकण्यात आला.
सोनमने तीन सुपारी किलर्सच्या मदतीने घडवून आणली राजाची हत्या
सोनम रघुवंशीने तिचा पती राजा रघुवंशीची तीन सुपारी किलर्सच्या मदतीने हत्या घडवून आणली. या प्रकरणात फरार असलेली सोनम रघुवंशी ८ जूनच्या रात्री उशिरा पोलिसांना शरण आली. त्यानंतर आता या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. शिलाँग पोलिसांनी रविवारी (२२ जून) या प्रकरणात सिलोम जेम्स या आणखी एका आरोपीला अटक केली. सिलोम जेम्सला घेऊन पोलीस कृष्णा विहार या सोसायटीत गेले होते. राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर सोनम जेव्हा इंदूरमध्ये परत आली तेव्हा ती याच सोसायटीतल्या एका फ्लॅटमध्ये राहिली होती. तिची ब्लॅक बॅग याच सोसायटीतून गायब करण्यात आली. हनिमून हत्याकांड प्रकरण देशभरात गाजत असतानाच आता सिलोम जेम्सच्या अटकेमुळे या प्रकरणातील ब्लॅक बॅगचं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. सिलोम इंदूरमध्ये प्रॉपर्टी डिलर म्हणून काम करतो.
सोनमच्या ब्लॅक बॅगमध्ये काय?
पोलिसांनी ज्या फ्लॅटमध्ये तपास केला तिथे त्यांना एका बॅगेचे जळालेले तुकडे मिळाले. हे तुकडे सोनमच्या बॅगचे असावेत अशी शक्यता आहे. या बॅगेतला ऐवज सिलोमने लपवल्याचा संशय पोलिसांना आहे. या बॅगेत मोठी रक्कम, इलेक्ट्रॉनिक उपकर आणि इतर पुरावे होते. राजाची हत्या केल्यानंतर ही बॅग घेऊन सोनम इंदूरला आली. तिने ही बॅग सिलोम जेम्सला दिली होती त्यानेच यातल्या गोष्टी सुरक्षित ठेवल्या आणि बॅग जाळली असा संशय पोलिसांना आहे. आता ब्लॅक बॅगचं रहस्य उलगडलं तर राजा रघुवंशीच्या हत्येचं रहस्यही उलगडू शकणार आहे असं पोलिसांना वाटतं आहे.
काय काय गोष्टी समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं
सोनम आणि राजा यांचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. त्यानंतर २० मे रोजी हे दोघंही हनिमूनला गेले. सुरुवातीला ते बंगळुरुला गेले. त्यानंतर गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात गेले. २३ मे रोजी ते शिलाँगला गेले आणि तिथल्या इस्ट खासी हिल्समधून बेपत्ता झाले. राजाचा मृतदेह २ जून रोजी पोलिसांच्या ड्रोनला दरीत आढळून आला. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहासह मिळून हत्येचा कट रचला होता. या प्रकरणात विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांच्यासह राज कुशवाहाला आणि सोनमला अटक करण्यात आली आहे. तर रविवारी पोलिसांनी सिलोम जेम्सलाही अटक केली आहे. मागील एक महिन्यात या सगळ्या घडामोडी घडल्या आहेत. आता पोलीस या तपासात काय काय तथ्यं समोर आणतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.