Honeymoon Murder : मेघालय या ठिकाणी घडलेल्या हनिमून मर्डरची चर्चा देशभरात आहे. राजा रघुवंशीला त्याची पत्नी सोनमने प्रियकर राज कुशवाहा आणि तीन सुपारी किलर्सच्या मदतीने ठार केलं. राज कुशवाहावर सोनमचं प्रेम होतं. पण घरातल्यांनी विरोध दर्शवला आणि सोनमचं लग्न राजा रघुवंशीशी करण्यात आलं. लग्नानंतर सात दिवसातच सोनमने राजाच्या हत्येचा कट रचला होता. आता या प्रकरणी राज कुशवाहाच्या घरी पोलिसांना पिस्तुल सापडलं आहे. पोलीस अजूनही सोनमच्या लॅपटॉपचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी काय माहिती दिली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना राज कुशवाहाच्या घरी पिस्तुल सापडलं आहे. हे पिस्तुल राज कुशवाहाचं आहे. पोलिसांच्या दृष्टीने शोधण्यासाठी कठीण असलेला हा पुरावा आता आमच्या हाती लागला आहे अशी माहिती इस्ट खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सैय्याम यांनी दिला आहे. हे पिस्तुल राज कुशवाहाचं आहे, मात्र याची नोंदणी किंवा हे पिस्तुल राजाच्या हत्येसाठी वापरलं गेलं होतं का? याबाबत पोलिसांनी काही भाष्य केलेलं नाही. पोलिसांनी राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मंगळवारी आठवी अटक केली. राजाची हत्या घडवून आणल्यानंतर सोनम ज्या फ्लॅटमध्ये लपली होती त्या फ्लॅटच्या मालकाला मेघालय पोलिसांनी अटक केली आहे. लोकेंद्र सिंग तोमर असं या आठव्या आरोपीचं नाव आहे. सोनमकडे असलेला लॅपटॉप, काळी बॅग आणि इतर महत्त्वाचे पुरावे लोकेंद्रने नष्ट केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. त्याआधी पोलिसांनी प्रॉपर्टी डिलर सिलोम जेम्सलाही अटक केली आहे. त्याच प्रमाणे ज्या इमारतीत सोनम लपली होती त्या इमारतीच्या वॉचमनलाही अटक केली आहे.

Sonam Raghuvanshi and Raj Kushwaha
सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी दिली प्रेमसंबंधांची कबुली (संग्रहीत फोटो)

राज कुशवाहा आणि सोनमचं अफेअर होतं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम आणि राज कुशवाहा हे राजा आणि सोनमचं लग्न होण्याच्या आधीपासूनच प्रेमात होते. मात्र सोनमच्या घरातल्यांना हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे राजा आणि सोनमचं लग्न ठरवण्यात आलं. ११ मे रोजी सोनम आणि राजाचं लग्न झालं. त्यानंतर २३ मेच्या दिवशी सोनमने राजाची हत्या घडवून आणली. दाओने वार करुन राजाला तीन सुपारी किलर्सनी ठार केलं. त्यानंतर त्याचा मृतदेह इस्ट खासी हिल्स येथील दरीत फेकण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२३ मे रोजी राजाची हत्या कशी झाली?

२३ मे रोजी राजा आणि सोनम हे दोघंही शिपारा होम स्टे या ठिकाणी आले. पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी या दोघांनी चेक इन केलं. त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास राजा आणि सोनम हे दोघंही ट्रेकला जाण्यासाठी तयार झाले. याचवेळी सोनमने ज्या तिघांना राजाच्या हत्येची सुपारी दिली होती ते तिघेही जवळच्या एका होम स्टेमध्ये राहिले होते. साधारण १० वाजण्याच्या सुमारास सोनम आणि राजाने ट्रेक करत असताना २ हजार पायऱ्यांचं अंतर पार केलं. त्याआधी त्यांची भेट आनंद, आकाश आणि विशाल यांच्याशी झाली होती. साधारण १० वाजण्याच्या सुमारास राजा, सोनम, आकाश, विशाल आणि आनंद या पाचही जणांना अल्बर्ट या टुरिस्ट गाईडने पाहिलं होतं. अल्बर्टने दिलेल्या महत्त्वाच्या माहितीमुळेच सोनमच यामागे असावी हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपासाची चक्रं फिरवली ज्यानंतर राज कुशवाहाला अटक करण्यात आली आणि त्यानंतर सोनम ८ जून रोजी पोलिसांना शरण आली.