दिल्लीच्या रस्त्यावर भर दुपारी घोडागाडीची शर्यत लागल्याचं रविवारी पाहायला मिळालं. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई करत १० जणांना अटक केली आहे. मध्य दिल्लीतील दर्या गंजजवळ जवाहरलाल नेहरू मार्गावर हा प्रकार घडला. भररस्त्यात घोडागाडींची वर्दळ झाल्याने इतर प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.
जवाहरलाल नेहरू मार्गावरून राजघाटापासून दिल्ली गेट, सिविक सेंटर आणि पहाडगंजच्या दिशेने काही घोडे जात असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांना मिळाली. रविवारी संध्याकाळी चारच्या दरम्यान प्राप्त झालेल्या या तक्रारीवर दिल्ली पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत कमला मार्केटजवळील रस्त्यांवर बॅरिकेट्स लावले. चार घोडागाड्या आणि त्यांच्या सहा चालकांना पोलिसांनी अटक केली आहे. तसंच, घोडागाडीची शर्यत व्यवस्थित व्हावी यासाठी रस्ता मोकळा करण्याकरता चार स्कुटीचालकही रस्त्यावर उतरले होते. या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
रविवारच्या दिवशी देशभरातील अनेक रस्त्यांवर ट्राफिक असते. फिरायला जाण्याच्या उद्देशाने अनेकजण गाड्या घेऊन बाहेर पडतात. दिल्लीच्या या रस्त्यावरही बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ होती. या वर्दळीमध्येच चार घोडागाड्या शिरल्याने वाहनातील प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कलम २८९,२६८,१८८,३४ आयपीसी सह कलम ११ अन्वये कारवाई केली आहे. तसंच, घोडेही जप्त करण्यात आले असून ते एमसीडीकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.