राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. राष्ट्रहित प्रथम हे ब्रीद असलेली संस्था आणि देशसेवाला सर्वोच्च महत्त्व देणारी ही संस्था आज शंभर वर्षांची झाली. संघाचे संस्थापक म्हणजे डॉ. केशव बळीराम हेडगेवार. त्यांच्यानंतर सरसंघचालक हे पद आलं ते गुरुजी गोळवलकरांकडे. त्यांच्याकडे हे पद कसं आलं तुम्हाला माहीत आहे का? संघाच्या शंभरीनिमित्त जाणून घेऊ याबाबत.

२० जून १९४० ला काय घडलं?

२० जून १९४० चा दिवस होता… त्यावेळी खोलीत एक डॉक्टर आणि एक प्रोफेसर होते.. डॉक्टरांचं वय झालं होतं.. आणि प्रोफेसर त्यांच्या मानाने तरूण होते.. डॉक्टर खूप आजारी झाले होते. त्यांनी थरथरत्या हातांनी त्या प्रोफेसरच्या हातात एक चिठ्ठी सोपवली.. या चिठ्ठीत काय लिहिलं होतं माहित आहे? ‘माझं शरीर तुम्ही डॉक्टरांच्या हवाली करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो.. ती ही आहे की आता या संघटनेची जबाबदारी पूर्णतः तुमची असेल.’ २१ जून १९४० त्या डॉक्टरांचं निधन झालं.. त्या डॉक्टरांचं नाव होतं… केशवराम बळीराम हेडगेवार. आज त्यांची जयंती आहे. हेडगेवार यांनी आपल्या संघटनेची जबाबदारी म्हणजेच RSS ची जबाबदारी डॉक्टरानंतर प्रमुख झालेल्या माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांच्यावर सोपवली.

Pune RSS Centenary Celebrations
RSS Dusshera Rally in Pune: शताब्दी वर्षात संघशक्तीचे विराट दर्शन, पुण्यात विजयादशमीला ७७ सघोष पथ संचलने, ८४ शस्त्रपूजन उत्सव (संग्रहित छायाचित्र)

माधव गोळवलकर वयाच्या ३४ व्या वर्षी सरसंघचालक झाले

माधव गोळवलकर हे तेव्हा ३४ वर्षांचे होते. त्यानंतर १९७३ पर्यंत म्हणजे माधव गोळवलकर यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्याकडे सरसंघचालक हे पद होतं. माधव गोळवलकर म्हणजेच गुरुजी गोळवलकर यांची ही निवड आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कारण त्यावेळी त्यांच्यापेक्षाही वरिष्ठ मंडळी संघात होती. पण डॉक्टर हेडगेवारांनी गोळवलकर यांच्याकडे सरसंघचालक पद सोपवलं आणि त्यानंतर त्यांना गुरुजी गोळवलकर असंही संबोधलं जाऊ लागलं.

गुरुजी गोळवलकरांनी घेतला होता मोठा निर्णय

१९४२ मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरोधात भारत छोडो आंदोलन सुरु केलं. त्यावेळी गुरुजी गोळवलकर यांच्यावर एक जबाबदारी येऊन पडली ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आंदोलनात सहभागी होणार की नाही? हा निर्णय घेण्याची. त्यावेळी गुरुजींनी निर्णय घेतला होता की या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाग घेणार नाही. पण संघात कार्यरत असलेल्यांना जर व्यक्तिगत पातळीवर या आंदोलनात भाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात. गुरुजींच्या या निर्णयानंतर काही स्वयंसेवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. नागपूरचे बाळासाहेब देशपांडे हे त्यांपैकीच एक होते. त्यांनी रामटेक येथील तालुका कार्यालयावरुन युनियन जॅक हटवला होता. त्यावेळी त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणावर झाली होती.

Mahatma Gandhi File Photo
महात्मा गांधी यांचे आणि गुरुजी गोळवलकरांचे मतभेद का झाले? (संग्रहीत फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

१२ सप्टेंबर १९४७ ला गुरुजी गोळवलकर आणि महात्मा गांधी यांची भेट

भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. त्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम भारतातल्या अनेक भागांमध्ये पोहचवण्याचं मोलाचं काम गुरुजी गोळवलकरांनी केलं होतं. ८ सप्टेंबर १९४७ ला दिल्ली हे अशांत क्षेत्र घोषित करण्यात आलं. ९ सप्टेंबर १९४७ ला महात्मा गांधी दिल्लीला पोहचले होते. त्यानंतर १२ सप्टेंबर १९४७ रोजी गुरुजी गोळवलकर आणि महात्मा गांधींची भेट झाली होती. यावेळी महात्मा गांधीं गोळवलकरांना म्हणाले की राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे हात रक्ताने माखले आहेत. त्यावर गुरुजी म्हणाले होते, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुणाचाही शत्रू नाही. मुस्लिमांची हत्या करण्यात कुणालाही स्वारस्य नाही. आमचा उद्देश जेवढं शक्य आहे तेवढं हिंदूचं रक्षण करणं हाच आहे.” ‘कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकातल्या १७७ व्या पानावर हा उल्लेख करण्यात आला आहे.

महात्मा गांधी गुरुजी गोळवलकर यांच्यात मतभेद झाले

महात्मा गांधींचे सचिव राहिलेल्या प्यारेलाल यांनी महात्मा गंधी द लास्ट फेज या पुस्तकात असं लिहिलं आहे की महात्मा गांधींनी गोळवलकर गुरुजींना असं सांगितलं की तुम्ही एक पत्रक जारी करा. त्या पत्रकात तुमच्यावर आणि संघावर मुस्लिमांच्या हत्येसंबंधी जे आरोप लागले आहेत ते खोडून काढा आणि मुस्लिमांच्या हत्या झाल्याचा निषेध नोंदवा. मात्र गोळवलकरांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही. या प्रस्तावावरुन या दोघांमध्ये मतभेद झाल्याचं प्यारेलाल यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे.

१६ सप्टेंबर १९४७ ला महात्मा गांधी यांनी दिल्लीतल्या वाल्मिकी मंदिरात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. त्यावेळी महात्मा गांधी म्हणाले होते “जर हिंदूंना हे वाटत असेल की भारतात मुस्लिमांना बरोबरीने बसवलं जाणार नाही आणि मुस्लिम हे समजत असतील की पाकिस्तानात हिंदू फक्त शिक्षा भोगणाऱ्या लोकांप्रमाणेच राहू शकतात तर या दोन्ही गोष्टी हिंदू आणि इस्लाम यांच्या पतनासाठी कारण ठरतील.” असंही प्यारेलाल यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

गोळवलकरांच्या काळातलं सर्वात मोठं आव्हान

१९४८ मध्ये महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यावेळी सत्तेत असलेल्या नेहरुंच्या सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेवर बंदी घातली. ५ फेब्रुवारी १९४८ ला ही बंदी घालण्यात आली. त्यानंतर गुरुजी गोळवलकर यांना अटकही करण्यात आली होती. तुरुंगातून गोळवलकरांनी सरकारशी पत्रव्यवहार केला आणि संघावरची बंदी हटवण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर नोव्हेंबर १९४८ मध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी ‘शाखा’ सुरु केली आणि सत्याग्रह सुरु केला. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजेच १९४९ मध्ये नेहरुंच्या सरकारने संघाला एक संविधान तयार करुन त्याचा मसुदा लिहा असं कळवलं. त्यानुसार गोळवलकर गुरुजींनी संघाच्या संविधानाचा मसुदा लिहिला आणि तो सरकारला पत्राने पाठवला. १९४८ ते १९५० हा काळ संघासाठी आव्हानात्मक होता. या काळातही गुरुजींनी संघाला नवी दिशा देण्याचं काम केलं. तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक यांनी ही माहिती दिली.