नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून किती दिवस सुट्टी घेतली? असा प्रश्न पंतप्रधान कार्यालयाला विचारण्यात आला होता. आरटीआयअंतर्गत विचारण्यात आलेल्या या प्रश्नाला पंतप्रधान कार्यालयाने उत्तर दिलं आहे. याच्या उत्तरात पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांमध्ये एकही सुट्टी घेतलेली नाही. आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल पी शारदा यांनी ३१ जुलै २०२३ रोजी नरेंद्र मोदींच्या सुट्ट्यांबाबतची माहिती मागणारा आरटीआय दाखल केला होता. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने उत्तर दिलं आहे.
यामध्ये पंतप्रधानांशी संबधित इतरही अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. जसे की, पंतप्रधान बनल्यापासून नरेंद्र मोदी दिल्लीतल्या पंतप्रधान कार्यालयात किती दिवस उपस्थित होते? पंतप्रधान बनल्यापासून त्यांनी किती आणि कोणकोणत्या कार्यक्रमांना हजेरी लावली?
या आरटीआयच्या उत्तरात पंतप्रधान कार्यायाने म्हटलं आहे की, नरेंद्र मोदी हे नेहमी ड्युटीवर असतात. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी कधीच सुट्टी घेतली नाही. तसेच पंतप्रधान ज्या-ज्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिले आहेत, त्याची माहिती पीएमओच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या उत्तरात पीएमओने एका संकेतस्थळाची माहिती दिली आहे. या संकेतस्थळावरील माहितीनुसार नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून ३,००० हून अधिक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या उत्तरावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिमंता सरमा यांनी ट्विटरवर लिहिलं आहे, माझे पंतप्रधान, माझा अभिमान. यापूर्वी २०१६ मध्येदेखील अशाच प्रकारचा आरटीआय दाखल केला होता. तेव्हाही पंतप्रधान कार्यालयाने उत्तरात म्हटलं होतं की, नरेंद्र मोदी हे नेहमी ड्युटीवर असतात.
यासह या आरटीआयमध्ये नरेंद्र मोदी यांच्या आधीच्या पंतप्रधानांच्या सुट्ट्यांविषयी माहिती मागितली होती. ज्यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, अटल बिहारी वाजपेयी, एचडी देवेगौडा, आय. के. गुजराल, पी. व्ही. नरसिंह राव, चंद्रशेखर, व्ही. पी. सिंह आणि राजीव गांधी यांच्या सुट्ट्यांविषयी माहिती मागितली होती. पंरतु, माजी पंतप्रधानांच्या सुट्ट्यांसबंधीची माहिती उपलब्ध नसल्याचं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.