अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वर्चस्वामुळे पुन्हा एकदा संकट निर्माण झालं आहे. देशातील नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचं चित्र आहे. यामुळे काबुल विमानतळावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली आहे. गर्दीला पांगवण्यासाठी अमेरिकन सैनिकांनी हवेत गोळीबार करावा लागला. अनेकजण अजूनही अफगाणिस्तानमध्ये अकलेले आहेत. काही लोक विमानावर चढलेले तर काही लोक चक्क विमानाला लटकलेले असलेले अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानवर तालिबानचे नियंत्रण असताना अनेक भारतीय अजूनही तेथे अडकले आहेत.
एनडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात निमलष्करी दलांसह २०० हून अधिक भारतीय सध्या काबूलमध्ये अडकले आहेत. एक भारतीय विमान सध्या काबूल विमानतळावर उभे आहे. मात्र, तालिबान्यांनी शहरात कर्फ्यू लावला असल्याने भारतीय नागरिकांना विमानतळावर कसे आणावे ही मुख्य चिंता आहे.
संपूर्ण जग चिंता व्यक्त करत असताना चीनने तालिबानकडे पुढे केला मैत्रीचा हात, म्हणाला…
काबुल हवाई क्षेत्र बंद
तालिबानमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) च्या सुमारे १०० सैनिकांचाही समावेश आहे, ज्यांच्यावर अफगाणिस्तानमधील भारतीय मिशनच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे काबुल हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. यामुळे काबूल विमानतळावरून एकही विमान उड्डाण करू शकणार नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काबूल विमानतळावरून कोणतीही उड्डाणे चालू शकत नाहीत कारण हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे.
सूत्रांनी सांगितले की, कॅबिनेट सचिव परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत नागरिकांना बाहेर काढण्याच्या योजनेबद्दल चर्चा करत आहेत. तेथे अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. तसेच अफगाणिस्तानमधील परिस्थिती झपाट्याने बिघडत असताना आणि तालिबान तेथे आपली पकड मजबूत करत असतांना भारतीय कर्मचाऱ्यांना बाहेर का काढण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.