पाच दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. एसव्हीआआर या सरकारी रुग्णालयाच्या शेजारी जळलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह हैदराबादमधील एका २७ वर्षीय तरुणीचा आहे. या प्रकऱणात महिलेचा पती मुख्य संशयित असून हत्या करुन तो फरार झाल्याचा अंदाज आहे.

मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणंही अशक्य असताना पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीने सुटकेस टाकण्यासाठी मदत घेतलेल्या टॅक्सीचा शोध घेतला आणि या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

पोलिसांनी टॅक्सी चालकाकडे चौकशी केली असता त्याने पीडित तरुणीचं नाव भुवनेश्वरी अशून ती चित्तोरची रहिवासी असल्याची माहिती मिळाली. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारी तरुणी हैदराबाद येथे कामाला होती. २०१९ मध्ये श्रीकांत रेड्डी यांच्यासोबत तिचं लग्न झालं होतं. त्यांनी १८ महिन्यांनी मुलगीदेखील आहे.

करोनामुळे श्रीकांतची नोकरी गेल्यानंतर दांपत्य तिरुपतीमध्ये राहण्यास आलं. नोकरी गेल्याने त्रस्त असलेल्या श्रीकांतने मद्यपानास सुरुवात केली होती ज्यामुळे दांपत्यामध्ये भांडण होत होतं

२२-२३ जूनच्या रात्रीदेखील दोघांमध्ये भांडण झालं आणि यावेळी श्रीकांतने भुवनेश्वरीची हत्या केली. त्याने टॅक्सीच्या सहाय्याने मृतदेह लपवलेली सुटकेस रुग्णालयाच्या कंपाऊंडमध्ये टाकून दिली. यानंतर रात्री तो पुन्हा आला आणि पेट्रोल टाकून सुटकेसला आग लावली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांतने आपल्या कुटुंबाला आणि सासरच्यांना डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली होती. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचंही त्याने सांगितलं होतं.

मात्र पोलिसांनी तपास करत टॅक्सी चालकाच्या सहाय्याने गुन्ह्याचा उलगडा केला आहे. दरम्यान पोलिसांनी फरार श्रीकांतला अटक करण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहेत.