Hyderabad Man dies after he collapsed while playing Badminton : हैदराबादमधील नागोली स्टेडियममध्ये रविवारी (२८ जुलै) एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील बॅडमिंटन कोर्टवर खेळत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. हा तरुण बॅडमिंटन खेळत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. गुंडला राकेश असं या तरुणाचं नाव असून तो हैदराबादमधील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता.
राकेश नेहमीप्रमाणे रविवारी नागोली स्टेडियममधील बॅडमिंटन कोर्टवर त्याच्या मित्रांबरोबर बॅडमिंटन खेळत होता. खेळता खेळता त्याला हृदयविकाराचा धक्का बसला अन् तो जमिनीवर कोसळला.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
राकेशला जमिनीवर निपचित पडलेलं पाहून त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या धक्क्यानेच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. राकेशला रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
नेमकं काय घडलं?
दरम्यान, स्टेडियममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून हा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये दिसतंय की राकेश खेळता खेळता जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्या दिशेने धाव घेतली, त्याला शुद्धीवर आणण्यासाठी धडपड केली. काही मिनिटात त्याच्या मित्रांनी त्याला तिथून उचलून नेलं. राकेश हा मुळचा खम्माम जिल्ह्यातील थल्लाडा गावचा रहिवासी आहे. तो थल्लाडा गावचे उपसरपंच गुंडला वेंकटेश्वरलू यांचा मुलगा आहे.
तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं वाढतं प्रमाण
दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे की तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे. या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही घटना आपल्या सर्वांसाठी एक मोठा इशारा आहे. आपल्याला आपलं आरोग्य व जीवनशैलीत बदल करण्याची आवश्यकता असल्याचा संदेश आपण यातून घेतला पाहिजे.
याआधी देखील देशातील विविध भागात अशाच प्रकारे तरुणांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालं आहे. खेळता-खेळता, व्यायामशाळेत व्यायाम करताना, कार्यालयात काम करत असताना, प्रवास करत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात पाहायला मिळाल्या आहेत.