Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत काही पुराव्यांचं सादरीकरण करत मतदान प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. यावरून राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करत राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोगाला सातत्यानं लक्ष्य करत आहेत. राहुल गांधी यांनी बंगळुरू येथील महादेवपुरा मतदारसंघातील मतदार याद्यांचे परीक्षण केल्याचं सांगत भाजपा व निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर खोचक टीका केली आहे.
निवडणूक आयोगाने मतदार यादीमध्ये ज्या मतदारांना मृत दाखवलं होतं, त्यांच्याबरोबर राहुल गांधींनी चहा घेतला आहे. तसेच त्यांच्याबरोबर चहा घेत ‘चाय पे चर्चा’ केल्याचा एक व्हिडीओ राहुल गांधींनी एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे. ज्या मतदारांना मतदार यादीत मृत दाखवण्यात आलं, त्यांच्याबरोबर चहा पिण्याचा अनुभव आल्याचं सांगत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचे खोचकपणे आभार मानले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
राहुल गांधींनी काय म्हटलं?
राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, “मला आयुष्यात अनेक मनोरंजक अनुभव आले आहेत. मात्र, ‘मृत लोकां’बरोबर चहा घेण्याचा अनुभव कधीच आला नव्हता. या अनोख्या अनुभवासाठी निवडणूक आयोगाचे आभार”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
जीवन में बहुत दिलचस्प अनुभव हुए हैं,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 13, 2025
लेकिन कभी 'मृत लोगों' के साथ चाय पीने का मौका नहीं मिला था।
इस अनोखे अनुभव के लिए, धन्यवाद चुनाव आयोग! pic.twitter.com/Rh9izqIFsD
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप कोणते?
राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर एकापाठोपाठ एक आरोपांचा भडिमार केला. त्यांचा पहिला आरोप हा निवडणुकीच्या वेळापत्रकासंदर्भातला होता. “भारतात एक काळ असा होता की, जेव्हा ‘ईव्हीएम’ नसताना सगळा देश एकाचवेळी मतपत्रिकेवर मतदान करायचा; पण आताच्या काळात अनेक महिने मतदानाची प्रक्रिया चालते. मतदानाचे इतके टप्पे का केले जातात, यावरून साशंकता निर्माण होते. बऱ्याचदा निवडणुकीचं वेळापत्रक बदललं जातं, हे सगळं निवडणूक नियंत्रित करण्यासाठी केलं जातं”, असा आरोप राहुल गांधींनी केला होता.
राहुल गांधींनी केलेला हा सगळ्यात मोठा आरोप मतचोरीचा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मतचोरीचा संशय अधिक बळकट झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या पाच वर्षांत जितके नवे मतदार जोडले गेले नाहीत, तितके पाच महिन्यांत जोडण्यात आले. मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर अचानकच मताधिक्यात वाढ होणे, बनावट मतदारांनी मतदान करणे, मतदार यादीत मतदारांचे खोटे पत्ते व अवैध फोटो असणे, कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघात एक लाख मतदारांची वाढ होणे, असे असंख्य आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केले आहेत.