लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी हरियाणामध्ये कशी व्होटचोरी झाली याबद्दल आरोप केले. त्यातला त्यांनी केलेला एक आरोप चर्चेत आहे. तो म्हणजे हरियाणाच्या निवडणुकीत ब्राझीलच्या मॉडेलने आरोप केल्याचा. ब्राझीलच्या मॉडेलने आता याबाबत समोर येत संवाद साधला आहे. मी भारतात कधीही आले नाही असं तिने म्हटलं आहे.
राहुल गांधी यांचा आरोप नेमका काय?
निवडणूक आयोगाला स्वच्छ निवडणूक नको आहे. हा ठोस पुरावा आहे. राहुल यांनी एका ब्राझिलियन मुलीचा फोटो दाखवला आणि विचारले, “निवडणुकीत तिची भूमिका काय आहे?” ते म्हणाले की, माझा एक प्रश्न आहे: हरियाणाच्या मतदार यादीत ब्राझिलियन मुलीची भूमिका काय आहे? हरियाणातील पाच श्रेणींमध्ये २५ लाख मते चोरीला गेली. एका विधानसभा मतदारसंघात एका महिलेने २२ वेळा मतदान केले. या महिलेने सरस्वती, स्विटी, संगिता अशा विविध नावांनी मतदान केलं आहे. ही महिला ब्राझीलची मॉडेल असून तिचं नाव मॅथ्युस फेरारो आहे असंही राहुल गांधी म्हणाले. तसंच त्यांनी तुम्ही या फोटोसह दिलेला कोड स्कॅन करुनही माहिती घेऊ शकता असंही सांगितलं.
ब्राझीलच्या मॉडेलने काय म्हटलं आहे?
मी आजवर कधीही भारतात आलेले नाही. त्यामुळे जे काही झालं ते सुरुवातीला वाटलं की प्रँक आहे. माझी कुणीतरी गंमत करतं आहे. पण सोशल मीडियावर अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. इतकंच नाही तर माझा शोध घेऊन लोक मला सोशल मीडियावर टॅग करु लागले त्यामुळे मी हे सांगते आहे की मी भारतात कधीही आलेले नाही. मी ब्राझीलमध्ये राहते. माझा जो फोटो दाखवण्यात आला आहे तो २०१७ मध्ये माझ्या घराबाहेर काढण्यात आलेला फोटो आहे. मी सोशल मीडिया पाहिलं आणि नेमकं काय घडलं ते माझ्या लक्षात आलं आहे. ब्राझीलच्या या मॉडेलचं नावही समोर आलं आहे. तिने बीबीसीशी संवाद साधला त्यावेळी हे विधान केलं आहे.
ब्राझीलच्या मॉडेलचं नाव नेमकं काय?
ब्राझीलच्या या मॉडेलचं नाव लॅरिसा नॅरी असं आहे. तिचा जो फोटो राहुल गांधींनी दाखवला तो २०१७ मध्ये काढण्यात आला आहे. मात्र तो फोटो वापरुन हरियाणात २२ वेळा मतदान झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ही मुलगी नेमकी कोण आहे? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला होता. आता बीबीसीशी बोलताना या मुलीने मी भारतात कधीही आले नाही तसंच मॉडेलिंगही सोडून दिलं आहे असं म्हटलं आहे. माझा फोटो वापरुन असं काही घडलं आहे याची पुसटशीही कल्पना मला नव्हती. दरम्यान राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपांनंतर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. राहुल गांधींना आम्ही ऑगस्ट महिन्यात पत्र पाठवून सांगितलं होतं ज्या नावांबाबत तुम्ही आरोप करत आहात त्याबाबत शपथपत्र दाखल करा आणि तुमची सही त्यावर करा असं आम्ही त्यांना म्हटलं होतं. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही असंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
