राज्यसभा निवडणुकीसाठी सध्या महाराष्ट्रासह देशभरातील इतर राज्यांमध्ये मतदान सुरु आहे. मतं फुटू नयेत यासाठी सर्व पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असताना कर्नाटकात एका आमदाराने काँग्रेसला मतदान केल्याने चर्चा रंगली आहे. जेडी(एस)चे आमदार के श्रीनिवास गौडा यांनी काँग्रेसला मतदान केलं असून आपल्याला हे आवडतं अशी प्रतिक्रिया दिली आहे.
“मी काँग्रेसला मतदान केलं आहे,” अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. यावर पत्रकारांनी कारण विचारलं असता ते म्हणाले की, “कारण मला हे फार आवडतं”.
जेडी(एस)चे प्रमुख एच डी कुमारस्वामी यांनी काँग्रेस पक्षाचे सिद्धरमय्या यांच्यावर मतं मिळवण्यासाठी आपल्या पक्षाच्या आमदारांना फूस लावली जात असल्याचा आरोप केला होता.
सिद्धरमय्या यांनी जेडी(एस)च्या आमदारांना खुलं पत्र लिहिल्यानंतर कुमारस्वामी यांनी हे आरोप केला होते. या पत्रात सिद्धरमय्या यांनी आमदारांना आपल्या पक्षाचे दुसरे उमेदवार मन्सूर अली खान यांना मतदान करण्याची विनंती केली होती.
सिद्धरमय्या यांच्यावर टीका करताना कुमारस्वामी म्हणाले होते की, “प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी (सिद्धरमय्या) आमदारांना पत्र लिहिलं नसल्याचं सांगितलं. त्यांनी हे पत्र आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ट्विटही केलं होतं. एक दिवसापूर्वी जे बोलले त्याचाच ते नकार देत आहेत. यावरुन त्यांच्यातील दुटप्पीपणा दिसत आहे”.
