बरेली : उत्तर प्रदेशच्या बरेली विभागातील चार जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देऊन तेथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. याअंतर्गत रस्त्यांवर सुरक्षा दले आणि हवेत ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. याबरोबरच संपूर्ण बरेली जिल्ह्यामध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा खंडित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
राज्य गृह विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मोबाइल इंटरनेट, ब्रॉडबँड आणि एसएमएस सेवा गुरुवारी दुपारी २ ते शनिवारी दुपारी २ या काळात बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. ‘भारतीय टेलिग्राफ कायदा, १८८५’चे कलम ७ आणि ‘दूरसंचार सेवांचे तात्पुरते निलंबन (सार्वजनिक आपत्कालीन किंवा सार्वजनिक सुरक्षा) नियम, २०१७’अंतर्गत हे निर्देश देण्यात आले आहेत.
अफवा पसरण्यासाठी आणि धार्मिक तणाव वाढवण्यासाठी फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सॲप यासारख्या समाजमाध्यमांचा गैरवापर केला जाऊ शकतो, त्यामुळे ही खबरदारी घेतल्याचे गृहसचिव गौरव दयाल यांनी सांगितले. बरेलीचे विभागीय संचालक भूपेंद्र चौधरी यांनी बरेली, शाहजहानपूर, पिलभित आणि बदायूं जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. बरेलीमध्ये ‘आय लव्ह मुहम्मद’ या पोस्टरवरून २६ सप्टेंबरला तणाव निर्माण झाला होता. तसेच दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत बरेलीमध्ये ८१ जणांना अटक करण्यात आली आहे.