I love Muhammad Row Twist: आरोपीने कितीही शिताफीने गुन्हा केला तरी तो काहीतरी पुरावा मागे सोडून जातो, असा संवाद आपण चित्रपटातून ऐकला असेल. याचीच पुनरावृत्ती सध्या उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये दिसून आली आहे. येथील मंदिरांवर आय लव्ह मुहम्मद अशा घोषणा लिहिल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. दोन समाजात तेढ निर्माण होत असतानाच पोलिसांनी मोठ्या शिताफीने खऱ्या आरोपींना जेरबंद केले, ज्यामुळे दोन गटातील संघर्ष थांबविण्यात पोलिसांना यश आले.
२५ ऑक्टोबर रोजी अलीगढच्या हिंदू मंदिरांवर काही जणांनी आय लव्ह मुहम्मद असा नारा लिहिला होता. मात्र हे लिहित असताना आरोपींनी स्पेलिंग चुकवली होती. चार ठिकाणी नारा लिहिण्यात आला होता. मात्र प्रत्येक ठिकाणी स्पेलिंग चुकलेले होते. काही ठिकाणी मुहम्मद ऐवजी मुहाद तर काही ठिकाणी मुमाद असे लिहिले होते. यामुळे पोलिसांना या प्रकरणात वेगळाच संशय आला. मुस्लिम समाजाला गोवण्यासाठी कुणीतरी हे मुद्दाम केल्याचा संशय पोलिसांनी घेतला.
अलीगडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नीरज कुमार यांनी या गुन्ह्याच चार जणांची अटक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. अटक झालेल्यांमध्ये दिलीप कुमार, आकाश, अभिषेक सारस्वत आणि निशांत कुमार यांचा समावेश आहे. तर आणखी एक आरोपी राहुल फरार असल्याचे त्यांनी सांगितले. अटक केलेली आरोपी ३० ते ३५ वयोगटातील आहेत.
जमिनीच्या वादातून कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी २५ सप्टेंबर रोजी लोढा परिसरातील भगवानपूर आणि बुलाकीगड गावांमध्ये मंदिरांच्या भिंतींवर नारे लिहून ठेवले जेणेकरून विरोधी गटावर आरोप होतील. तपासात निष्पन्न झाले की, आरोपींनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना धडा शिकवण्यासाठी भिंतीवर नारे लिहून ठेवले होते.
२५ ऑक्टोबर रोजी सदर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस गावात पोहोचले. यावेळी उजव्या विचारसरणीच्या संघटनेने आरोप केल्यानंतर पोलिसांनी मौलवी मुस्तकीम, गुल मोहम्मद, सुलेमान, सोनू, अल्लाबक्ष, हसन, हमीद आणि युसूफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नंतर अटक झालेल्या खऱ्या आरोपींचा आणि या मुस्लीम व्यक्तींचा जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद झाला होता. या वादामुळे दोन गटात हाणामारीही झाली होती.
स्पेलिंगमध्ये चूक
दरम्यान मागच्या महिन्यात बरेली येथे ‘आय लव्ह मुहम्मद’ अशी घोषणा एका बॅनरवर लिहिलेली दिसली होती. पण त्यात आणि यात फरक दिसून आला. स्पेलिंगमधील चूक लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. खऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी फिल्ड इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला.
