घोटाळेग्रस्त नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि. (एनएसईएल)च्या दोन डझनभर सदस्यांच्या व्यावसायिक कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. गुंतवणूकदारांची सुमारे ५६०० कोटी रुपयांची देणी थकविणाऱ्या गैरव्यवहाराचा या सदस्यांवर प्रामुख्याने दोषारोप आहे.
मुंबईसह, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकाता, नागपूर, जयपूर आणि अन्यत्र प्राप्तिकर विभागाच्या विविध चमूंकडून छापे टाकण्यात आलेल्या २४ सदस्यांपैकी बहुतांश हे प्रत्यक्षात अन्य कोणा व्यक्तीसाठी स्पॉट एक्स्चेंजवर आजवर व्यवहार करीत होते, असाही संशय आहे. या सदस्यांनी ज्या बदल्यात एकूण ५६०० कोटींचे व्यवहार केले तो माल आणि जिन्नस गोदामांमध्ये त्या प्रमाणात आहे काय, हे तपासण्याबरोबरच त्यांच्या लेखा नोंदी आणि व्यवहारांचा तपशील पाहून संभाव्य करचुकवेगिरीचा या छाप्यातून छडा लावण्याचा हेतू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
खुद्द एनएसईएल तसेच वस्तू वायदे बाजाराचे नियंत्रक- ‘फॉरवर्ड मार्केट्स कमिशन’कडून या घोटाळेबाज सदस्यांशी निगडित आर्थिक तपशील मिळविल्यानंतरच प्राप्तिकर विभागाकडून हे छापे टाकण्यात आले. ‘एनएसईएल’ने मार्च २०१४ पर्यंत विविध ३० हप्त्यांमध्ये गुंतवणूकदारांचे सर्व ५६०० कोटी रुपये चुकते करण्याच्या केलेल्या दाव्याप्रमाणे, तीन दिवसांपूर्वी पहिला रु. १७४.७२ कोटींचा हप्त्या देय होता; परंतु त्यापैकी जेमतेम निम्मे रु. ९२.१२ कोटीच तिला अदा करता आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2013 रोजी प्रकाशित
‘एनएसईएल’ सदस्यांच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाचे छापे
घोटाळेग्रस्त नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि. (एनएसईएल)च्या दोन डझनभर सदस्यांच्या व्यावसायिक कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे टाकले.
First published on: 22-08-2013 at 06:16 IST
TOPICSएनएसईएल
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I t conducts nationwide searches on nsel members