Donald Trump Claim India Has Stopped Importing Russian Oil: गेल्या काही दिवसांपासून विविध दावे करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी आणखी एक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी भारत रशियन तेल आयात थांबवत असल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत आणि ते एक चांगले पाऊल आहे. पण, परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्ट केले की देशाची ऊर्जा खरेदी बाजारपेठेतील शक्ती आणि राष्ट्रीय हितसंबंधांमुळे होते. तसेच भारतीय तेल कंपन्यांनी रशियन तेल आयात थांबवल्याच्या वृत्तांबद्दल कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही.
भारत रशियन तेल आयात थांबवत असल्याचा दावा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एएनआयला सांगितले की, “मला समजले आहे की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. मी जे ऐकले आहे, ते खरे आहे की नाही हे मला माहित नाही. पण, हे एक चांगले पाऊल आहे. पुढे काय होते ते आपण पाहू.”
रशियन तेल खरेदी थांबवली?
दरम्यान, भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. विशेषतः युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून, भारत रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार राहिला आहे. पण रॉयटर्सच्या अलीकडील वृत्तानुसार, अज्ञात स्त्रोतांचा हवाला देऊन, भारतीय सरकारी रिफायनर्सनी गेल्या आठवड्यात रशियन तेल खरेदी केलेले नाही, असे सूचित होते. पण या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
भारताला ट्रम्प यांचा इशारा
तत्पूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला होता. याचबरोबर, शस्त्रास्त्रे आणि कच्च्या तेलासाठी रशियासोबत व्यापार करत असल्याने भारताकडून अतिरिक्त दंड आकारण्याचा इशाराही दिला होता.
यापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल कराराची घोषणा करताना भारतावर टीका केली होती की, “कदाचित पाकिस्तान कधीतरी भारताला तेल विकेल!” ते म्हणाले होते की, “आम्ही या भागीदारीचे नेतृत्व करणारी तेल कंपनी निवडण्याच्या प्रक्रियेत आहोत. कोणाला माहित आहे, कदाचित ते कधीतरी भारताला तेल विकतील!”
भारताचे प्रत्युत्तर
दरम्यान, भारताने हे स्पष्ट केले आहे की, “भारत आणि रशियामध्ये स्थिर आणि काळाची कसोटी लागलेली भागीदारी आहे.” याचबरोबर, भारताने दोन्ही देशांमधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंधांवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ट्रम्प यांचे दावे फेटाळले आहेत.
“विविध देशांसोबतचे आमचे द्विपक्षीय संबंध गुणवत्तेवर आधारित आहेत आणि त्यांना तिसऱ्या देशाच्या प्रिझममधून पाहिले जाऊ नये. भारत आणि रशियामध्ये स्थिर आणि काळाची कसोटी लागलेली भागीदारी आहे”, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले होते.