भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात पुढच्या आठवडयात अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक चिनूक हेलिकॉप्टर्सचा समावेश होणार आहे. हे हेलिकॉप्टर हॉवित्झर तोफा वाहून नेण्यास सक्षम असून चीन-पाकिस्तानला लागून असलेल्या उंचावरील प्रदेशात सैनिकांची तैनाती करणे आता अधिक सुलभ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सप्टेंबर २०१५ मध्ये अमेरिकन कंपनी बोईंग बरोबर ८,०४८ कोटी रुपयांचा चिनूक हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार करण्यात आला होता. पंधरापैकी पहिल्या चार हेलिकॉप्टर्सचा चंदीगड येथील हवाई दलाच्या १२६ हेलिकॉप्टर युनिटमध्ये समावेश होणार आहे. सध्या या युनिटकडे रशियन बनावटीची दोन एमआय-२६ हेलिकॉप्टर आहेत.

१९९९ साली कारगिल युद्धाच्यावेळी तोफा तसेच २०१३ मध्ये उत्तराखंड पुराच्यावेळी बुलडोझर पोहोचवण्याची कामगिरी एमआय-२६ हेलिकॉप्टर्सनी पार पाडली होती. एमआय-२६ चे आयुर्मान वाढवण्यासाठी व आणखी सुधारणांसाठी हे हेलिकॉप्टर्स रशियाला पाठवण्यात येणार आहेत. चिनूकच्या तुलनेत एमआय-२६ मोठे हेलिकॉप्टर आहे. २० टन वजन आणि ८२ युद्ध सज्ज सैनिक वाहून नेण्याची एमआय-२६ ची क्षमता आहे.

चिनूकची फक्त १० टन वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. मार्च २०२० पर्यंत सर्व १५ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाला सुपूर्द करण्यात येतील. चिनूक प्रमाणचे एएच-६४ ई अपाची लढाऊ हेलिकॉप्टर्सही जुलै २०१९ ते मार्च २०२० दरम्यान भारतीय हवाई दलात दाखल होतील. सप्टेंबर २०१५ मध्ये १३,९५२ कोटींचा करार करण्यात आला. पठाणकोट आणि जोरहाट तळावर ही हेलिकॉप्टर्स तैनात होतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iaf to get chinooks next week
First published on: 20-03-2019 at 17:59 IST