|| संतोष सावंत

वाळूत माखलेले हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवत ती चार वर्षांची चिमुरडी आपल्या पडक्या घराच्या दारात उभी होती. अफगाणिस्तानकडून बांगलादेशकडे जाणाऱ्या त्या मार्गावर वस्ती तशी तुरळकच होती. त्यात हे पडकं घर तर अगदीच एका बाजूला होते. धुळीचे लोट स्वत:भोवती गोल गिरक्या घेत उंच आकाशात जाताना पाहून तिला मजा वाटत होती. ती दारातून चालत थोडीशी पुढे आली. आता तिला घोडय़ांच्या टापांचे आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ  लागले होते. त्यामुळे ती अधिकच खूश झाली. दोन्ही हातांनी टाळ्या पिटत चालू लागली. आपल्याला सुंदर घोडे पाहायला मिळणार या आनंदात ती असतानाच कोणीतरी तिला उचलून एका बाजूला नेले. ती घाबरून ओरडली, पण त्या गदारोळात तिचा नाजूक आवाज कोणाला ऐकूच गेला नाही. तिनं रागानं मागं वळून पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर चक्क हास्य उमललं आणि म्हणाली, ‘‘आजी, तू आहेस होय. किती घाबरले होते मी. मी तुझ्याशी कट्टी आहे. कारण तू मला घोडे पाहायला दिले नाहीस!’’

‘‘आली मोठी शहाणी कट्टी घेणारी. एवढं काय बघायचं होतं गं तुला?’’ आजीने खोटेच रागे भरत तिला विचारलं. ‘‘अगं किती घोडे आहेत? कुठे चालले आहेत? आणि..?’’ आपण आजीशी कट्टी घेतली आहे, हे विसरून ती भराभर बोलू लागली. ते ऐकून आजीला हसू आले. ‘‘एवढंच ना, चल घरी. मी सांगते तुला त्यांची गोष्ट!’’ आजी घरच्या दिशेनं चालू लागली आणि मागोमाग तिची नात!

‘‘ते घोडदळ पाकिस्तानचं होतं. दर चार वर्षांनी या देशातील शूरवीरांचं एक दल मौल्यवान खजिन्याच्या शोधात निघतं. या दलात सामील होण्यासाठी खूप खडतर आव्हानांचा सामना करावा लागतो. २७ वर्षांपूर्वी त्यांच्या दलानं तो खजिना प्राप्त केला होता. पुन्हा तो खजिना मिळवण्यासाठी ते आजही जंग जंग पछाडत आहेत.’’ आजी सांगत होती आणि नात मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती.

‘‘आजी २७ वर्षांपूर्वी तो खजिना त्यांनी कसा मिळवला?’’ नातीच्या प्रश्नात उत्सुकता होती.

आजी रंगात येऊन सांगू लागली, ‘‘खूप अडचणींचा सामना करत त्यावेळेस त्यांनी आपलं ध्येय साध्य केलं होतं. मोहिमेच्या सुरुवातीलाच त्यांना पराजयाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजच्या दलाने त्यांना धूळ चारली. परंतु खचून न जाता त्यांनी त्यानंतर वाटेत आडव्या आलेल्या झिम्बाब्वेच्या दलाला नामोहरम केलं. यानंतर इंग्लंडविरुद्धची त्यांची लढाई खराब हवामानामुळे हुकली. यानंतरचा प्रवास अधिकच कठीण होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका या बलाढय़ शत्रूंनी त्यांची दाणादाण उडवली.’’

‘‘अगं आजी, पण तू तर म्हणालीस की त्यांनी तो मौल्यवान खजिना मिळवला,’’ नातीनं आश्चर्यानं विचारलं.

‘‘हो, गं बाई. खरंच आहे ते. सलग झालेल्या दोन पराभवामुळे त्यांचं दल पेटून उठलं. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यासारख्या बलाढय़ दलांचा बचाव लीलया भेदत त्यांनी खजिन्याच्या दिशेने अंतिम प्रवासास सुरुवात केली. आता खजिना केवळ दोन पावलांवर होता, पण हा टप्पा सोपा नव्हता. पराभवानं चिडलेलं न्यूझीलंडचं दल पुन्हा वाट अडवून उभं ठाकलं. पण या बहाद्दरांनी पराक्रमाची शर्थ करत पुन्हा विजयश्री खेचून आणली.’’ आजीचा स्वर आता टिपेला पोहोचला होता.

‘‘मग शेवटी मिळाला का त्यांना तो खजिना?’’ नातीनं अधीर होत विचारलं.

‘‘हो, इंग्लंडला पराभवाची चव चाखायला लावून त्यांनी तो मौल्यवान खजिना मिळवला,’’ आजीने गोष्ट संपवली आणि नातीनं टाळ्या वाजवायला सुरुवात केली.

‘‘आज २७ वर्षांनंतर पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आश्चर्य वाटावं इतकं साम्य त्यावेळच्या आणि आजच्या प्रवासात आहे. अगदी जसंच्या तसं घडतं आहे म्हण ना. आणखी एक योगायोग म्हणजे त्यावेळी पाकिस्तानच्या दलाचे जे सरदार होते ना, तेच आज त्यांच्या देशाचे राजे आहेत,’’ अशी आजीने अधिक माहिती पुरवली.

‘‘मग आजी, यावेळेस खजिना त्यांनाच मिळणार ना?’’ नातीच्या या निरागस प्रश्नावर भाष्य करणे टाळून आजीने तिला जवळ घेत फक्त सूचक स्मित केले.