भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी थांबवण्यात आला आहे. मँचेस्टरच्या मैदानात पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे पंच आणि सामनाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे. उर्वरित खेळ हा राखीव दिवशी म्हणजेच बुधवारी खेळवला जाईल. कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ४६.१ षटकानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. यानंतर सुमारे ४ तास पाऊस थांबेल याची वाट पाहिली गेली. पंच आणि सामनाधिकारी यांनी खेळपट्टीची पाहणीही केली, मात्र पाऊस थांबत नसल्यामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान त्याआधी, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय काहीसा फसला. सलामीवीर मार्टीन गप्टील अवघ्या एका धावेवर माघारी परतला. जसप्रीतच बुमरहाने त्याचा बळी घेतला. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि हेन्री निकोलस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जाडेजाने हेन्री निकोलसचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली. यानंतर मैदानात आलेल्या अनुभवी रॉस टेलरने कर्णधार विल्यमसनच्या साथीने न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. कर्णधार विल्यमसनने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकही झळकावलं. मात्र चहलच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजाकडे झेल देत तो माघारी परतला. त्याने ६७ धावांची खेळी केली.

विल्यमसन माघारी परतल्यानंतर रॉस टेलरने डावाची सुत्र आपल्या हातात घेतली. जिमी निशम आणि कॉलिन डी-ग्रँडहोमही झटपट माघारी परतले. मात्र टेलरने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं. पावसामुळे खेळ थांबवला गेला तेव्हा टेलर नाबाद ६७ धावांवर खेळत होता. भारताच्या सर्व गोलंदाजांना १-१ बळी मिळाला.

Live Blog

23:10 (IST)09 Jul 2019
पावसामुळे दिवसाचा खेळ रद्द

सामना राखीव दिवशी होणार

22:12 (IST)09 Jul 2019
मँचेस्टरच्या मैदानात पाऊस थांबला, पंच खेळपट्टीच्या पाहणीसाठी मैदानात

सामन्याची षटकं कमी करायची की सामना राखीव दिवसात खेळवायचा याचा निर्णय घेतला जाणार

21:34 (IST)09 Jul 2019
मँचेस्टरमध्ये पुन्हा एकदा पावसाची हजेरी

सामना राखीव दिवसावर जाण्याची शक्यता

21:22 (IST)09 Jul 2019
मँचेस्टरमध्ये पावसाने घेतली उसंत

पंच आणि सामनाधिकारी मैदानात येऊन करत आहेत खेळपट्टीची पाहणी

20:45 (IST)09 Jul 2019
मँचेस्टरमध्ये अजुनही पावसाचा खेळ सुरुच....

जाणून घ्या शक्यता....

19:59 (IST)09 Jul 2019
काय सांगतात आयसीसीचे नियम...
19:58 (IST)09 Jul 2019
मँचेस्टरमध्ये पाऊस थांबण्याची शक्यता कमीच

अंदाजे अर्धा ते एक तास पाऊस थांबण्यासाठी वाट पहावी लागणार

19:31 (IST)09 Jul 2019
जर न्यूझीलंडचा संघ सामन्यात पुन्हा फलंदाजीसाठी उतरला नाही तर...

असं असेल भारतासमोरचं आव्हान...

18:34 (IST)09 Jul 2019
सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबवला

४६.१ षटकानंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे खेळ थांबवण्यात आला आहे

18:24 (IST)09 Jul 2019
न्यूझीलंडला पाचवा धक्का, कॉलिन डी-ग्रँडहोम बाद

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक धोनीकडे झेल देत डी-ग्रँडहोम माघारी

मात्र न्यूझीलंडने ओलांडला २०० धावांचा टप्पा

18:17 (IST)09 Jul 2019
रॉस टेलरचं अर्धशतक

विल्यमसन माघारी परतल्यानंतर रॉस टेलरने दुसऱ्या बाजूने संघाची बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं

18:05 (IST)09 Jul 2019
न्यूझीलंडला चौथा धक्का, जिमी निशम माघारी

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने घेतला झेल

17:38 (IST)09 Jul 2019
न्यूझीलंडला मोठा धक्का, कर्णधार विल्यमसन माघारी

युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजाने घेतला झेल.

भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना करताना विल्यमसनची ६७ धावांची खेळी

17:11 (IST)09 Jul 2019
कर्णधार केन विल्यमसनची झुंज सुरुच

भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करताना झळकावलं अर्धशतक, न्यूझीलंडचा डाव सावरला

16:30 (IST)09 Jul 2019
रविंद्र जाडेजाने फोडली न्यूझीलंडची जमलेली जोडी

हेन्री निकोलस जाडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत. निकोलसची ५१ चेंडूत २८ धावांची खेळी

16:11 (IST)09 Jul 2019
हेन्री निकोलस आणि केन विल्यमसन जोडीने सावरला न्यूझीलंडचा डाव

दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत रचली अर्धशतकी भागीदारी.

15:18 (IST)09 Jul 2019
न्यूझीलंडला पहिला धक्का

सामन्याच्या चौथ्याच षटकांत न्यूझीलंडला पहिला धक्का बसला आहे. बुमराहने न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलला बाद करत भारताला अश्वासक सुरूवात करून दिलीआहे. ३.४ षटकानंतर न्यूझीलंडने एक बाद एक धावा केल्या आहेत. 

15:11 (IST)09 Jul 2019
सलग दोन षटके निर्धाव

भुवनेश्वर कुमार आणि बुमराहने दोन षटके निर्धाव टाकत न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. भूवनेश्वर कुमारने मार्टिन गप्टिलला तर बुमराहने हेन्री निकोल्सला षटक निर्धाव टाकले. दोन षटकानंतर न्यूझीलंडने बिनबाद शून्य धावा केल्या आहेत. 

15:07 (IST)09 Jul 2019
पहिल्याच चेंडूवर भारताने DRS गमावला

सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर भारतीय संघाने DRS गमावला. भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीची सुरूवात केली.  न्यूझीलंडच्या मार्टि न गप्टिलला भुवनेश्वरने टाकलेला चेंडू पॅडला लागला. त्यानंतर पंचाने नाबाद दिल्यानंतर पहिल्याच चेंडूवर भारतीय संघाने DRS घेतला. मात्र, तिसऱ्या पंचाने गप्टिलला नाबाद ठरवले आणि भारतीय संघाने पहिल्याच चेंडूवर DRS गमावला. भुवनेश्वर कुमारने पहिलेच षटक निर्धाव टाकले.

14:41 (IST)09 Jul 2019
असा आहे भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक),  हार्दिक पंडय़ा,  यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार,  जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत.

14:37 (IST)09 Jul 2019
भारतीय संघात एक बदल

कुलदीप यादव ऐवजी यजुवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जाडेजाला अंतिम ११ मध्ये कायम ठेवण्यात आले आहे.   

14:34 (IST)09 Jul 2019
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकली

केन विल्यमसनने नाणेफक जिंकून फलंदाजी स्वीकारील आहे.  भारताला गोलंदाजीसाठी आमंत्रीत केले आहे.  न्यूझीलंडच्या संघात एक बदल करण्यात आला आहे.

14:24 (IST)09 Jul 2019
विराट-विल्यमसनबद्दलचा ११ वर्षांनंतर जुळून आला हा योगायोग, निकालही तोच लागणार?

कोहली आणि विल्यमसन विश्वचषकात एकमेंकासमोर उभे ठाकण्याची काही पहिली वेळ नाही. याआधी दोन्ही कर्णधार विश्वचषकात एकमेंकाविरोधात लढले आहेत. २००८ मध्ये अंडर-१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत झाली होती. सविस्तर वाचा

14:13 (IST)09 Jul 2019
मैदानाच्या परिसरातील हवाई वाहतूक बंद

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्यादरम्यान मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानाच्या परिसरातील हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती बीसीसीआयला दिली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान 'जस्टिस फॉर काश्मीर' असे बॅनर लावलेल्या हेलिकॉप्टरच्या स्टेडियमभोवती घिरट्या घातल्या होत्या. याची तक्रार बीसीसीआयने केली होती. यावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सामन्यादरम्यान मैदानाच्या परिसरातील हवाई वाहतूक बंद केली आहे.

14:06 (IST)09 Jul 2019
रोहित शर्माला विक्रमाची संधी

आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम बहरात असलेला रोहित प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित सध्या अग्रस्थानी आहे. ज्या पद्धतीने रोहितची तुफान फलंदाजी सुरू आहे, ती पाहता तो या स्पर्धेतच हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा

14:04 (IST)09 Jul 2019
बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करणं न्यूझीलंडसाठी कठीण – डॅनिअल व्हिटोरी

विश्वचषकातील सामन्यांमध्ये बुमराहने उत्तम गोलंदाजी करत सर्वांची वाहवा मिळवली होती. अशातच न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज डॅनिअल व्हिटोरी यानंदेखील बुमराहबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. बुमराहच्या भेदक माऱ्याचा सामना करणं न्यूझीलंडच्या फलंदांचासाठी कठीण असल्याचं मत व्हिटोरी यानं व्यक्त केलं. वाचा सविस्तर

14:04 (IST)09 Jul 2019
बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करणं न्यूझीलंडसाठी कठीण – डॅनिअल व्हिटोरी

विश्वचषकातील सामन्यांमध्ये बुमराहने उत्तम गोलंदाजी करत सर्वांची वाहवा मिळवली होती. अशातच न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज डॅनिअल व्हिटोरी यानंदेखील बुमराहबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. बुमराहच्या भेदक माऱ्याचा सामना करणं न्यूझीलंडच्या फलंदांचासाठी कठीण असल्याचं मत व्हिटोरी यानं व्यक्त केलं. वाचा सविस्तर

14:03 (IST)09 Jul 2019
उपांत्य सामन्यात नाणेफेकच ठरणार ‘बॉस’

विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना आज मंगळवारी मँचेस्टरमध्ये रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात नाणेफीकाचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. यंदाच्या विश्वचषकाचे विश्लेषण केले असता नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने सामन्यात बाजी मारल्याचे चित्र समोर येते. सविस्तर वाचा

14:02 (IST)09 Jul 2019
उपांत्य सामन्याआधी सचिनचा टीम इंडियाला सल्ला

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा या दोन्ही खेळाडूंना भारतीय संघात जागा द्यावी असा सल्ला, माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने दिला आहे. तो India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. सविस्तर वाचा

13:58 (IST)09 Jul 2019
मैदानाबाहेर प्रेक्षकांची गर्दी

उपांत्य सामन्याला भारतीय प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान निळ्या रंगाने भरले आहे.

13:56 (IST)09 Jul 2019
थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्याची नाणेफेक थोड्याच वेळात होणार आहे. नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजी करू शकतो.