World Cup 2019 स्पर्धेत कर्णधार केन विल्यमसन आणि कॉलिन डी-ग्रँडहोम यांनी मधल्या फळीत केलेल्या संयमी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ४ गडी राखून मात केली आहे. या पराभवासह २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं दक्षिण आफ्रिकेचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २४२ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने संयमी शतकी खेळीची नोंद केली. त्याने नाबाद १०३ धावा केल्या. मधल्या फळीत कॉलिन डी-ग्रँडहोमने ६० धावा काढत त्याला चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून फर्ग्युसनने ३ बळी घेतले. मात्र ढिसाळ क्षेत्ररक्षणाने आफ्रिकेने सामना गमावला.
या सामन्यात सलामीवीर मार्टिन गप्टिल याने डावाला अत्यंत संथ सुरुवात केली होती. १५ व्या षटकात तो ५८ चेंडूत ३५ धावांवर खेळत होता. त्यावेळी तो एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना त्याचा पाय स्टंपला लागला आणि तो बाद झाला.
An unfortunate dismissal for Martin Guptill in Wednesday’s game!
(Don’t miss that reaction from #FafDuPlessis!)#CWC19 | #NZvSA pic.twitter.com/NWxByjDjm9
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 20, 2019
दरम्यान, सलामीवीर हाशिम आमला आणि मधल्या फळीत वॅन डर डसन यांच्या अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात २४१ धावांपर्यंत मजल मारली आहे. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना किमान दीड तास उशीरा सुरु झाला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. मात्र यानंतर हाशिम आमला आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी संघाचा डाव सावरत, आव्हानात्मक धावसंख्या गाठली.
ट्रेंट बोल्टने यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकचा त्रिफळा उडवत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिसही फारकाळ झुंज न देता माघारी परतला. एका बाजूने हाशिम आमला तळ ठोकून होता. यानंतर आमलाने एडन मार्क्रमच्या साथीने भागीदारी रचत आफ्रिकेच्या डावाला आकार दिला. यादरम्यान आमलाने आपलं अर्धशतकही साजरं केलं. मिचेल सँटरनरने त्याला बाद करत आफ्रिकेची जोडी फोडली.
यानंतर मधल्या फळीत वॅन डर डसन, डेव्हिड मिलर यांनी फटकेबाजी करत संघाला २०० चा टप्पा ओलांडून दिला. डसनने नाबाद ६७ तर आमलाने ५५ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने ३, तर ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी-ग्रँडहोम आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.