|| तुषार वैती

‘‘पाकिस्तानची फलंदाजी इतकी कशी बहरू शकते, याचेच आश्चर्य वाटते,’’ पाकिस्तानचे माजी कर्णधार मिसबा उल हक यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी केल्यानंतरची ही प्रतिक्रिया. खरे तर गेल्या काही वर्षांत पाकिस्तानचा संघ बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे मिसबाकडून अशी प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. पण पाकिस्तानच्या दशकभराच्या यशाची कमान अभिमानाने उंचावणाऱ्या मिसबासारख्या माजी कर्णधाराकडून आपल्याच संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, हे अनपेक्षित होते.

२००९मध्ये श्रीलंकन बसवर लाहोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जणू पाकिस्तानमधील क्रिकेटला तिलांजली देण्यात आली. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांसारख्या बडय़ा देशांनी पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळणे थांबवले. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानसारख्या क्रमवारीत खालच्या क्रमांकावर असलेल्या देशांनी सुरुवातीला पाकिस्तानात जाण्यास होकार दर्शवला, पण नंतर त्यांनीही माघार घेतल्यामुळे पाकिस्तानला आपले ‘घर’चे क्रिकेट संयुक्त अरब अमिरातीत हलवावे लागले. परिणामी, पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) उत्पन्न घटत गेले. भारतानेही जवळपास दशकभरापासून पाकिस्तानसोबतचे क्रिकेटसंबंध संपुष्टात आणल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटला जणू घरघर लागली. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लवादाकडे दाद मागितली. पण लवादानेही त्यांना जबर धक्का देत मोठी रक्कम नुकसानभरपाई म्हणून भारतीय क्रिकेट मंडळाला देण्याचे आदेश दिले. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या ‘पीसीबी’साठी हा मोठा धक्का होता.

‘पीसीबी’मधील प्रशासनाच्या गोंधळानंतर देशांतर्गत क्रिकेटचा दर्जा अधिकच खालावत गेला. त्यातच संघनिवडीत ‘पीसीबी’च्या पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप पाकिस्तानी क्रिकेटच्या प्रगतीत मारक ठरला. इम्रान खान यांनी १९९२मध्ये पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर जावेद मियाँदाद, हनिफ मोहम्मद, इन्झमाम उल-हक, वासिम अक्रम, वकार युनूस, सईद अन्वर, शोएब अख्तर यांनी पाकिस्तानी क्रिकेटची देदीप्यमान परंपरा जोपासली. पण इन्झमाम, अक्रम, अन्वर आणि अख्तरच्या निवृत्तीनंतर पाकिस्तानला दर्जेदार गोलंदाज आणि फलंदाजांची फळी तयार करता आली नाही.

२०१७मध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये झालेल्या निकालनिश्चिती प्रकरणामुळे सहा खेळाडूंवर बंदी घालण्यात आली. निकालनिश्चिती प्रकरणात सातत्याने असणारा खेळाडूंचा सहभाग यामुळेही पाकिस्तानातील क्रिकेट डागाळले गेले. पायाभूत सोयीसुविधांचा अभाव ही पाकिस्तानी क्रिकेटला भेडसावणारी मोठी समस्या. कायम दहशतवादाच्या सावटाखाली असणाऱ्या पाकिस्तानात क्रीडाविषयक सोयीसुविधा उभारण्यासाठी कोणताही देश पुढे सरसावत नाही. युवा खेळाडूंना आपले कौशल्य विकसित करण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी अद्ययावत सोयीसुविधांनी सुसज्ज अशा प्रशिक्षण शिबिरांची उणीव भासत आहे. त्यामुळेच प्रतिस्पध्र्यावर हुकूमत गाजवेल, अशी दुसरी फळी पाकिस्तानला तयार करता आली नाही. विद्यमान संघातील बाबर आझम, फखर झमान, हसन अली, शादाब खान यांच्यावर पाकिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे. पण त्यांनीही आपल्या वैयक्तिक कौशल्यांच्या जोरावरच इथवर मजल मारली आहे.

गेल्या दोन वर्षांतील पाकिस्तानच्या कामगिरीचा आलेख घसरतच गेला आहे. चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरल्यानंतर पाकिस्तानला एकाही बलाढय़ संघाविरुद्ध मालिका जिंकता आलेली नाही. त्यांनी दोन्ही मालिका विजय अनुक्रमे श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्ध (प्रत्येकी ५-०च्या फरकाने) मिळवले आहेत. मात्र परदेशात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना ५-० तर इंग्लंडविरुद्ध ४-० अशा फरकाने सपाटून मार खावा लागला आहे. आशिया चषकात त्यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले तर दक्षिण आफ्रिकेला कडवी लढत देत त्यांनी पाच सामन्यांची मालिका २-३ अशी गमावली.

मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करा, शेवटच्या चेंडूपर्यंत प्रतिस्पध्र्याला कडवी लढत द्या. हरण्याची भीती मनात येऊ देऊ नका. आपल्या रणनीतीची अचूक अंमलबजावणी करा किंवा त्यानुसार खेळा, हे विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि १९९२च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार इम्रान खान यांचे शब्द सर्फराज खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने खरे करून दाखवले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या विजयाने पाकिस्तानी क्रिकेटच्या दुर्दशेला कारणीभूत असणाऱ्या काही गोष्टी अधोरेखित झाल्या असल्या तरी पुढील आव्हानाला ते कसे सामोरे जातात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.