प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी निर्दयी राहण्याचा दिलेला कानमंत्र घेऊन पाकिस्तानचे खेळाडू शुक्रवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा सामना करतील. त्यामुळे सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत.
विंडीजविरुद्धच्या पहिल्या लढतीत फक्त १०५ धावांत ढेपाळणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध तीनशेहून अधिक धावा रचून पहिला विजय मिळवला. अनुभवी मोहम्मद हाफीझ, बाबर आझम आणि कर्णधार सर्फराज अहमद यांच्यावर पाकिस्तानच्या फलंदाजांची प्रामुख्याने मदार असून गोलंदाजीत मोहम्मद आमिर, वहाब रियाझ आणि फिरकीपटू शादाब खान यांच्यावर अवलंबून आहे.
दुसरीकडे श्रीलंकेने वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीमुळे अफगाणिस्तानला पराभूत केले. मात्र फलंदाजांची डोकेदुखी कायम असून न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेने १४ धावांत पाच, तर अफगाणिस्तानविरुद्ध ३६ धावांत सात बळी गमावले. त्यामुळे दिमुथ करुणारत्ने व कुशल परेरा यांना संघाच्या फलंदाजीची धुरा पुन्हा वाहावी लागणार आहे. लसिथ मलिंगा, नुवान प्रदीप यांना कामगिरीत सातत्य राखण्याची आवश्यकता आहे.