विश्वचषक स्पर्धेत विंडीजविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने २३ धावांनी विजय मिळवला. अविष्का फर्नांडोच्या विक्रमी शतकाच्या जोरावर श्रीलंकेने विंडीजला ३३९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना निकोलस पूरनने ११८ धावांची खेळी केली, पण ती खेळी व्यर्थ ठरली. या विजयासह श्रीलंकेने गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली, तर विंडीजच्या संघाला नवव्या स्थानी घसरावे लागले.

३३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचे पहिले २ गडी झटपट बाद झाले. सुनील अम्ब्रीस आणि शाय होप हे दोघे प्रत्येकी ५ धावा काढून माघारी परतले. शिमरॉन हेटमायर आणि ख्रिस गेल या दोघांनी डाव सावरला. पण गेलदेखील मोठा फटका मारताना बाद झाला. त्याने १ चौकार आणि २ षटकार मारून बाद झाला. पाठोपाठ हेटमायरदेखील २९ धावांवर माघारी झाला. निकोलस पूरनने कर्णधार जेसन होल्डरला साथीला घेत डाव पुढे नेला आणि अर्धशतक केले.

विंडीजचा डाव सावरतो असे वाटत असतानाच होल्डर २५ धावांवर माघारी परतला. लगेचच कार्लोस ब्रेथवेटदेखील ८ धावा करून बाद झाला. फॅबियन ऍलनने दमदार अर्धशतक झळकावले पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्याने ५१ धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात फटकेबाजीची गरज असताना पूरनने शानदार शतक ठोकले. पण त्यानंतर तो लगेचच माघारी परतला. १०३ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकार मारून तो ११८ धावांवर बाद झाला आणि विंडीजच्या आशा मावळल्या. मलिंगाने सर्वाधिक ३ बळी घेतले.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. ९३ धावांची भक्कम सलामी श्रीलंकेचे सलामीवीर करुणरत्ने आणि कुशल परेरा यांनी दिली. मोठा फटका मारताना कर्णधार जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर करुणरत्ने ३२ धावांवर बाद झाला. पण कुशल परेराने डाव सावरत अर्धशतक पूर्ण केले. तो धावेच्या गोंधळामुळे धावबाद झाला. पहिली धाव पूर्ण करून तो दुसरी धाव घेण्यासाठी धावला, पण त्याला अविष्का फर्नांडोने धावेसाठी नकार दिला. पण त्याच्या दुर्दैवाने तो क्रीजमध्ये वेळेत पोहोचू शकला नाही. ६४ धावा करून त्याला तंबूत परतावे लागले. त्यानंतर कुशल मेंडिसच्या साथीने फर्नांडोने डाव पुढे नेला. मेंडिसने चांगली सुरुवात केली होती, पण फॅबियन ऍलन च्या गोलंदाजीवर तो त्याच्याकडेच झेल देऊन बाद झाला.

त्यानंतर अनुभवी अँजेलो मॅथ्यूजही चांगली सुरुवात मिळाल्यानंतर बाद झाला. त्याने २० चेंडूत २६ धावा केल्या. अविष्का फर्नांडोने मात्र एक बाजू लावून धरली आणि दमदार शतक झळकावले. पण शतक ठोकल्यानंतर तो लगेचच बाद झाला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकवणारा तो सर्वात तरुण श्रीलंकन फलंदाज ठरला. त्याने १०३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकार खेचत १०४ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लाहिरू थिरिमन्ने याने डाव सावरत श्रीलंकेला तीनशे पार मजल मारली. थिरिमन्नेने नाबाद ४५ धावा केल्या.