लसिथ मलिंगाचा भेदक मारा आणि त्याला धनंजय डि-सिल्वाच्या फिरकीने दिलेल्या साथीच्या जोरावर श्रीलंकेने यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला आहे. इंग्लंडला २१२ धावांवर रोखत श्रीलंकेने धक्कादायक विजयाची नोंद केली. इंग्लंडकडून बेन स्टोक्स आणि जो रुटने अर्धशतकी खेळी करत संघाला विजयपथापर्यंत आणून सोडण्याचा प्रयत्न केला, मात्र लंकेच्या माऱ्यासमोर त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. श्रीलंकेने  २० धावांनी सामन्यात बाजी मारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोला पहिल्याच षटकात पायचीत करत मलिंगाने इंग्लंडला धक्का दिला. यानंतर दुसरा सलामीवीर जेम्स विन्सही फारशी चमक दाखवू शकला नाही. यानंतर जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची छोटेखानी भागीदारी झाली. यादरम्यान जो रुटने लंकेच्या माऱ्याचा सामना करत आपलं अर्धशतकही साजरं केलं. उदानाने कर्णधार मॉर्गनला आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करत माघारी धाडलं.

यानंतर जो रुटही मलिंगाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मधल्या फळीत बेन स्टोक्सने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे श्रीलंकेने सामन्यात आपलं वर्चस्व कायम राखलं. अखेरच्या षटकांपर्यंत लंकेच्या गोलंदाजांनी बेन स्टोक्सला मोठे फटके खेळण्याची संधी न देता धावगतीवरचा अंकुश कायम ठेवला. अखेरच्या षटकांमध्ये बेन स्टोक्सने फटकेबाजी करत लंकेच्या गोटात चिंतेच वातारवरण निर्माण केलं होतं. मात्र नुवान प्रदीपने अखेरच्या फलंदाजाला माघारी धाडत लंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने ४, धनंजय डी-सिल्वाने ३ तर उदानाने २ आणि नुवान प्रदीपने १ बळी घेतला.

त्याआधी, यजमान इंग्लंडने २०१९ विश्वचषक स्पर्धेत आपली धडाकेबाज कामगिरी सुरु ठेवली. लीड्सच्या मैदानात इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ २३२ धावांपर्यंत मजल मारु शकला. अँजलो मॅथ्यूज, फर्नांडो आणि मेंडीस यांनी थोडीफार झुंज दाखवली. मॅथ्यूजने नाबाद ८५ धावांची अर्धशतकी खेळी केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा श्रीलंकेचा निर्णय पुरता फसला. कर्णधार दिमुथ करुणरत्ने आणि कुसल पेरेरा झटपट माघारी परतले. यानंतर अविष्का फर्नांडो आणि कुशल मेंडीस यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत लंकेचा डाव सावरला. वुडने फर्नांडोला बाद करत श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली. यानंतर अँजलो मॅथ्यूजने इंग्लंडच्या गोलंदाजीचा संयमाने सामने करत संघाचा डाव सावरला.

लंकेच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुन्हा एकदा हाराकिरी करत विकेट टाकण्याचा धडाका सुरु ठेवला. मात्र मॅथ्यूजने आपलं अर्धशतक झळकावत श्रीलंकेला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. इंग्लंडकडून मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. त्यांना आदिल रशिदने २ तर ख्रिस वोक्सने १ बळी घेत चांगली साथ दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup 2019 sri vs eng leeds psd